|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधी

आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधी 

वाढता वयोगट, रुग्णालयातील अफाट खर्च, छोटी घरे आणि कुटुंब, बदलती जीवनशैली या पार्श्वभूमीवर घरचे रुग्ण व वडिलधाऱयांची काळजी घेणे या साऱयांसाठी अधिकांश घरामध्ये रुग्ण व आरोग्य सेवा हे क्षेत्र संदर्भ आणि स्वरुपात पण झपाटय़ाने विकसित होत आहे.

वयस्कर मंडळी व रुग्ण यांना वृद्धाश्रमात ठेवण्याकडे असणारा मुलांचा कल काळानुसार कमी होऊ लागल्याचे दिसून येते. यामागे दुहेरी कारणे दिसून येतात. यातील प्रमुख कारण म्हणजे वृद्ध नातेवाईकांना वृद्धाश्रमात ठेवण्याकडे आजही भावनिक संदर्भात व अखेरचा व नाईलाजाने स्वीकारलेला पर्याय म्हणून पाहिले जाते. या संदर्भातील दुसरे व तेवढेच महत्त्वाचे कारण म्हणजे जनसामान्य व कुटुंबीयांचा अद्यापही वृद्धाश्रमातील सेवा आणि व्यवस्था आणि व्यवस्थापन यावर पुरता विश्वास निर्माण झालेला नाही. या संदर्भात विशेषतः विदेशात राहणाऱया व भारतातील आपल्या वृद्ध आई-वडील वा नातेवाईकांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी प्रसंगी अधिक पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱयांच्या मनात पण वृद्धाश्रमातील सेवा-व्यवस्थापनाबद्दल साशंकता ही असतेच.

या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत वृद्ध-रुग्णांची घरच्या घरी व घरगुती म्हणजेच आपुलकीसह निगा राखण्यासाठी व्यवस्था घरी उपलब्ध करून देण्यावर अनेकांचा भर असलेला दिसून येतो. या व्यवस्थेला आवश्यक असा प्रतिसाद लाभला असल्याने त्याचा फायदा वाढत्या संख्येत संबंधित लोक घेत असल्याने या वैद्यकीय उपक्रमातून आरोग्य सेवा क्षेत्रात विविध स्तरावर ज्या वाढत्या रोजगार संधी झाल्या त्याचाच हा गोषवारा.

आज आरोग्य सेवा क्षेत्रात वैद्यक निदान, सल्ला, उपचार, वैयक्तिक-वैद्यकीय सेवा इ. क्षेत्रात विशेषतः राष्ट्रीय स्तरावर ज्या संस्था आस्थापना काम करीत आहेत त्या दृष्टीने आज या साऱयांसमोरची प्राधान्य तत्त्वावरील समान बाब म्हणजे आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशिक्षित प्राधान्य तत्त्वावरील समान बाब म्हणजे आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशिक्षित कर्मचाऱयांची निवड झाली असून यामध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य चिकित्सा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट इ. चा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो.

या संदर्भात कर्मचारी निवड क्षेत्रात सध्या कर्मचाऱयांची निवड करणाऱया आरोग्य सेवा कंपन्यांचे प्राधान्य तत्त्वावरील ध्येय व यावर्षी निवड करावयाच्या कर्मचाऱयांची संख्या या संदर्भात खालील आकडेवारी व तपशील पुरेसा बोलका ठरतो.

अपोला हॉस्पिटल – 1800 कर्मचारी. यामध्ये 400 घरगुती परिचारिका, 1200 फार्मसिस्ट व 200 प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा समावेश आहे.

पोर्टिया – 2000 कर्मचारी. यामध्ये 800 विक्री प्रतिनिधी व 800 वैद्यकीय विक्री प्रतिनिधींचा समावेश आहे.

मॅक ऍट होम- 900 कर्मचारी, मुख्यतः फार्मासिस्ट व घरगुती परिचारिका

केअर 24- 3000 ते 5000 कर्मचारी यामध्ये सुमारे 2000 आरोग्य सेवक, 1000 परिचारिका व वैद्यकीय समुपदेशक-डॉक्टर्स यांचा समावेश आहे.

हेल्थकेअर ऍट होम- 1500 कर्मचारी. यामध्ये प्रामुख्याने परिचारिका, आरोग्य समुपदेशक व त्याखालोखाल फिजिओथेरपिचा समावेश आहे.

नाईटिंगेस-1000 कर्मचारी यामध्ये 400 ते 500 आरोग्य सेवक, 200 परिचारिका व 300 फिजिओथेरपिस्टच समावेश आहे.

डॉ. लाल पॅथलॅब्ज – 200 ते 250 कर्मचारी मुख्यतः वाहनचालक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

फार्मईसी- 300 कर्मचारी. प्रामुख्याने फार्मासिस्ट व तंत्रज्ञ.

वनएमजी – 200 कर्मचारी. फार्मासिस्ट व वाहनचालक.

हेल्थीयन्स – 500 कर्मचारी. फिजिओथेरपिस्ट व प्रयोगशाळा सहाय्यक.

माय मेडिसीन बॉक्स – 300 कर्मचारी. बीएससी पदवीधर उमेदवार.

मेडलाईफ – 1000 कर्मचारी. यामध्ये 600 फार्मसिस्ट, 250 प्रयोगशाळा तंत्रज्ञ व वाहनचालकांचा समावेश आहे.

या आकडेवारीवरून आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या व प्रमुख निवडक कंपन्यांमधील कर्मचाऱयांची तातडीची संख्या व स्थिती स्पष्ट होते. या कंपनी व्यवस्थापनांच्या मते आरोग्य सेवा क्षेत्र हे सुरुवातीपासून व परंपरागतरित्या सेवा समर्पित असे राहिले असले तरी प्राप्त परिस्थितीत त्याला निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड देणे अपरिहार्य झाले. वृद्ध मंडळी व रुग्णांना घरी व घरगुती स्वरुपाची आरोग्यसेवा देणाऱया कर्मचाऱयांच्या संदर्भात तर ही बाब विशेष आवश्यक व महत्त्वाची ठरते. यात भर पडते ती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समाधान वाटेल अशा कर्मचाऱयांची नेमणूक करण्याची व या साऱयांमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात नेमक्या व कार्यक्षम कर्मचाऱयांची निवड करणे मोठेच आव्हानपर ठरले आहे.

आरोग्य सेवा क्षेत्रात आज असणारे दुहेरी व्यवस्थापनपर आव्हान म्हणजे आरोग्य सेवा व्यवसायाची होणारी मोठी वाढ व त्याचवेळी प्रचलित कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाण्याचे वाढते प्रमाण. या संदर्भातील प्रमुख असे उदाहरण सांगायचे झाल्यास अपोलोच्या घरगुती आरोग्य सेवा क्षेत्रांतर्गत मोठय़ा प्रमाणात परिचारिकांची निवड करणे अशक्यप्राय ठरते, त्याचवेळी वेगवेगळय़ा कारणांनी नोकरी सोडून जाणाऱया परिचारिकांच्या संख्येने या आव्हानात दुहेरी भर पडल्यागत होते.

आरोग्य सेवा क्षेत्रात वाढत्या कर्मचारी सेवांची पूर्तता करण्यासाठी विविध संस्था वेगवेगळय़ा प्रकारे प्रयत्न करीत आहेत. उदाहरणार्थ मणिपाल रुग्णालयांनी आपली वाढती संख्या व त्यासाठी आवश्यक अशा कर्मचाऱयांच्या प्रशिक्षणासाठी संस्थेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातच मूलभूत व महत्त्वाचे बदल तर केलेच शिवाय कर्मचाऱयांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यास पण सुरुवात केली आहे.

या शिवाय आरोग्य सेवा क्षेत्राची कर्मचारीविषयक वाढती गरज पुरविण्यासाठी काही स्टार्ट अप कंपन्या पण आपल्या कल्पकतेसह पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये  प्रामुख्याने पोर्टिया, अवर होम हेल्थकेअर, केअर-24 यांचा समावेश केला जातो. दरम्यान पुण्याच्या ‘बार्टी’ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन-प्रशिक्षण संस्थेने तर प्रशिक्षित आरोग्य सेवकांसाठी ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवा विषयक विशेष अल्पकालिन अभ्यासक्रम सुरू करून आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचारी प्रशिक्षणाला नवा आयाम दिला असून हे सारे प्रयत्न आरोग्य सेवा क्षेत्रासाठी प्रशिक्षित कर्मचाऱयांच्या गरजेची पूर्तता करतानाच विविध स्तरावर संबंधितांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे दुहेरी व महनीय काम करणार आहेत.

 

दत्तात्रय आंबुलकर

Related posts: