|Friday, October 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वेद याचे भाट झाले

वेद याचे भाट झाले 

कवी नरेंद्र हा श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्याने किन्नराच्या मुखातून त्याचे स्वतःचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्णाचे विलक्षण रसपूर्ण वर्णन केले आहे, ते असे-

श्रीकृष्णाचे वर्णन करताना किन्नर म्हणाला-राजा! हा कृष्ण सोमवंशी क्षत्रिय आहे. यदुकुळातील शूरसेनाचा पुत्र वसुदेव जेव्हा जन्माला आला तेव्हा त्रैलोक्मयात दुंदुभी वाजल्या व मोठा उत्सव झाला, म्हणून त्याला आनकदुंदुभी म्हणतात त्या वसुदेवाला दोन पुत्र, एक बलराम व दुसरा श्रीकृष्ण. ते दोन्ही अत्यंत रूपवान आहेत. त्यांनी लहानपणीच आपल्या पराक्रमाने असुरांच्या आडदांडपणाला खीळ घातली. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण होताच आकाशाच्या अंगावर भीतीचा कांटा उठतो तीच नक्षत्रे आहेत. त्याचे दास्य स्वीकारलेल्या अगणित राजांनी त्याच्यावर जी छत्रे धरली आहेत, त्यामुळे तेथे दिवस रात्र कळत नाही. पण तेथे अंधार मात्र नसतो कारण कृष्णाचा थोरला बंधू बळीभद्राचा मुखचंद्र सतत प्रकाशत असतो. त्यामुळे अंधार उरतच नाही. तो बलभद्र आपल्या नांगराने पृथ्वी उलथून टाकतो. त्याचे वर्णन काय करावे? खरं म्हणजे भगीरथाने गंगा हिमालयावरून खाली आणली हे खरे नाही. बलरामाच्या पराक्रमाने व तपाने हिमालयाचे बर्फ वितळले व ते पाणी खाली खळाळत आले, तीच गंगा होय. श्रीकृष्ण हा या बलरामाचा धाकटा भाऊ. त्याच्या शस्त्रांच्या धाकाने देवगण थरथरतात. या श्रीकृष्णाची थोरवी ऐकता ऐकता वेद स्तब्ध झाले व नंतर याचे भाट झाले. त्याचे सर्व वर्णन करणे कोणालाही शक्मय नाही. तरी राजा, सांगतो ऐक! तो समुद्राच्या पोटातील एका बेटावर राज्य करतो. स्वर्गातील देव त्याची आज्ञा पाळतात. दीन दुबळय़ांची दु:खे दूर करण्यात हा इतका मग्न असतो की ब्रह्मदेवादिक आले तरी त्यांना याची भेट मिळत नाही, त्यांना थांबावे लागते. त्याचे मोठेपण किती सांगावे? अनादि काळाचा तो स्वामी आहे. आपल्या सत्त्वगुणी वृत्तीने त्याने काळाचा महाकाळ जो मृत्यू त्याला बांधून टाकले आहे. तिन्ही लोक जिची घरटी आहेत अशा मायेलासुद्धा त्याचे थोरपण कळत नाही. समुद्रातील छोटय़ा भूभागावर तो राज्य करतो पण पृथ्वीवरचे असंख्य राजे तिथे सेवेसाठी येतात. आकाश पूर्वी पांढरे होते पण कृष्णाच्या प्रखर तापाने ते होरपळले तेव्हापासून ते काळसर झाले. याच आगीत जळाला तेव्हापासून सूर्यही उष्ण झाला. कृष्णाच्या खड्गाला राहू जिथे घाबरतो तिथे त्याच्या पराक्रमाचे काय वर्णन करावे? त्याचा प्रतापही इतका शीतल आहे की मोठमोठय़ा राजांचा प्रताप यामुळे थंड झाला. हा विरोधाभास वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. सूर्यचंद्रांची ग्रहणे अल्पकाळ टिकतात, पण शत्रूच्या पराक्रमाला कृष्णाच्या पराक्रमाचे ग्रहण अखंड लागले आहे ते सुटतच नाही. त्यामुळे या ग्रहण काळात असुरांच्या बायका अलंकार, द्रव्य, धान्याचे अखंड दान करीत असतात व प्रार्थना करतात की हे ग्रहण लवकर सुटू दे. त्याने पूतनेसारखी अबला मारली यात नवल नाही. अविद्येसारखी महाराक्षसी त्याचे नाव ऐकताच नाश पावते.

Ad. देवदत्त परुळेकर