|Friday, October 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिवसेना, भाजपच्या यात्रा

शिवसेना, भाजपच्या यात्रा 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती आलेली आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागलेली आहे. भाजपने राज्यात सभासद नोंदणीला प्रारंभ केला असतानाच शिवसेनेचे युवा नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शुक्रवारी कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन घेऊन जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. राज्यातील ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेला यश मिळाले आणि जिथे मिळाले नाही अशा सर्व ठिकाणी यात्रा जाणार आहे. पाठोपाठच 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकास रथयात्रा प्रत्येक मतदारसंघात पोहोचणार आहे. लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यश आणि पाठोपाठ मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱयांनी यात्रा सुरू करण्याला महत्व आहे. विशेष म्हणजे सेनेतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पक्षातून वारंवार पुढे केले जात असताना ही यात्रा विशेष महत्वाची आहे. त्यामुळेच ठाकरेंसाठी नेहमीच यशदायी ठरलेल्या कोल्हापुरातून त्याचा होतोय. राज्यातील सत्तेची समसमान विभागणी झाली पाहिजे हा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यासाठी राज्यात निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करताना पहिली अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे या अटीवर शिवसेनेने भाजपशी लोकसभा निवडणुकीत युती केली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक होऊन युती झाली होती. अर्थात त्याबाबतच्या घोषणेवेळी शिवसेनेच्या आग्रहाला भाजपने संमती दर्शवली तरी घोषणा केली नव्हती.  निकालानंतर भाजपने पुन्हा एकदा आपलाच मुख्यमंत्री असा जयघोष सुरू केल्यावरून वादाची परिस्थितीही उदभवली होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दटावणीनंतर भाजप मंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. पण, म्हणून भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबतीतले उद्गार काही थांबवलेले नाहीत. एकाचवेळी युतीच्या विजयाची आणि मुख्यमंत्रीपदावरील दाव्याची भाषा होतच आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी ‘आमचं सारं ठरलं आहे, इतर कोणीही त्याबाबतीत वक्तव्यं करू नयेत’ असं स्पष्ट केलं होतं. त्यावरून ठाकरे यांनी ‘सर्व काही समसमान हवं’ अशी भूमिका पुन्हा मांडली होती. तर विधीमंडळ अधिवेशनाच्या सांगतेला ‘मी पुन्हा येईन….’ अशा आशयाच्या कवितेने मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला होता. या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास दिसला होता. अर्थातच काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांच्या हाती आयता येणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीपूर्वीच बाद ठरल्याने राज्य सरकारच्या भात्यात एक ब्रह्मास्त्र येऊन पडलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले तरीही राज्य सरकारच्या बाजुने पहिला निकाल लागलेला असल्याने सरकारचे पारडे अपेक्षेपेक्षाही जड झालेले आहे. नव्याने भाजप आणि शिवसेनेकडे मोठय़ा प्रमाणावर झुकू लागलेला मराठा समाज आणि मोठय़ा संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे नेते आणि साक्षात विरोधी पक्ष नेत्यांच्याच पक्षांतरामुळे विरोधी पक्ष हैराण आहे. त्यातच वंचित आघाडीने चेष्टा चालविल्याप्रमाणे स्वतःच काँग्रेसला जागा सोडण्याची घोषणा करत काँग्रेसची मानहाणी केली. राष्ट्रवादीचे तर त्यांनी नावही घेतले नाही. त्यामुळे राज्यातील प्रमुख विरोधकांना सत्ताधाऱयांच्याऐवजी आधी प्रकाश आंबेडकरांशीच दोन हात करण्यात वेळ खर्ची घालावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असली तरीही सत्तेवर कमांड आपल्याच पक्षाची असली पाहिजे यासाठी दोघेही प्राणपणाने झटत आहेत. भाजपची दीड कोटी आणि शिवसेनेची एक कोटी मते असल्याचे गत विधानसभेला स्पष्ट झाले आहे. त्यात युतीमुळे जागा कोणाच्या जास्त वाढणार हा मुद्दाही आहेच. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घटता जनाधार आपल्या बाजुने यावा आणि आपला मूळचा मतदार आपल्याला सोडून मित्रपक्षाच्या नादाला लागू नये यासाठी सर्व तऱहेचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. भाजपच्या नव्याने होणाऱया सभासद नोंदणीत आपले सैनिक आणि मतदार भाजपच्या गळाला लागू नयेत यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी म्हणून आदित्य ठाकरे यांना मैदानात धाडले आहे. गेल्या निवडणुकीवेळी उध्दव ठाकरे यांना कनिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला लावण्याची खेळी भाजपने खेळली होती. ती उलटवत आदित्य ठाकरे चर्चेला गेल्याने तो बराच वादाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे नंतर सेनेने आदित्य ठाकरे यांनाच निर्णय प्रक्रियेत दुसऱया क्रमांकावर आणून बसवले. गेल्या दोन तीन वर्षात प्लास्टिक बंदीसह विविध निर्णयांमध्ये शिवसेना मंत्र्यांच्या बरोबर आदित्य ठाकरेही दिसू लागले. मुंबईतील अनेक निर्णय, उद्घाटने त्यांच्या उपस्थितीत वा हातून केले गेले. लोकसभा निवडणुकीतही ते सक्रीय होते. त्यातूनच आदित्य हे शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा घडवली गेली. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रहही पक्षातून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांचा दौरा सुरू होत आहे. त्याचवेळी मुंबई तुंबण्याचे खापरही ठाकरे परिवारावर फुटत आहे. तर रशियापासून अमेरिकेत व्हाइट हाऊसही तुंबले आहे याचा प्रचार सेना करत आहे. युतीमध्ये वर वर कितीही गोड वातावरण दिसत असले तरीही प्रत्येक जिल्हय़ातील प्रभावी मतदार संघावरून दोन्ही पक्षात प्रचंड चढाओढ सुरू आहे. लोकसभेला भाजपला काही मतदार संघात नमते घ्यावे लागले होते. आता मित्रपक्षांच्या 18 जागा आणि नव्याने पक्षात प्रवेश करणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवरूनही तणाव आहेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढती लोकप्रियता आणि मोदींच्या प्रमाणेच त्यांना पर्याय असा नेता विरोधकांकडे कुठे आहे? असे प्रश्न करून विविध व्यावसायिक कंपन्यांमार्फत पत्रकार, राजकारण्यांच्या मतांची चाचपणी आणि पेरणीही सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात कमी वयाचे, पाच वर्षे पूर्ण केलेले मुख्यमंत्री आणि इतर बाबतीतले विक्रमही चर्चेला आले आहेत. पक्षांतर्गत दुसरे नाव पुढे येणार नाही अशी व्यूहरचनाही आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचीही साथ असल्याचे वातावरण तयार झाले आहे. अंतिम मंत्रीमंडळ विस्ताराचा सदुपयोगही मुख्यमंत्री करून घेत आहेत. विरोधी पक्ष सावरायच्या आत सत्तेच्या दोन दावेदारांची तयारी मात्र यातून दिसू लागली आहे.