|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरिअरची ऑफिस फोडणाऱया पसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांला अटक

कुरिअरची ऑफिस फोडणाऱया पसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांला अटक 

5 लाख 93 हजारांच्या रोकड, एक होंडा सिटी कर, एक एलईडी टिव्ही असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रेकॉर्डवरील एका फरारी गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून चोरी केल्याचे कोल्हापूर जिह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड या सहा जिह्यातील 14 ठिकाणाचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. तसेच चोरटय़ाकडून 5 लाख 93 हजारांची रोकड, एक होंडा सिटी कार, एक एलईडी टीव्ही संच असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

बबन सर्जेराव जाधव (वय 47, मुळ रा. चौधरीवाडी, ता. फलटण, सध्या रा. समर्थविश्व अपार्टमेंट, संभाजी चौक, खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याचा साथिदार सतीश चव्हाण (रा. गुळुंची, ता. पुरंदर, जि. पुणे) हा पसार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. गुन्हेगार बबन जाधव याने जिह्यातील शाहुपुरी व शहापूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात 13 जून एकाच रात्रीमध्ये कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून त्यामधील 2 लाखांच्या रोकडच्या लॉकरसह कार्यालयातील सीसीटीव्ही पॅमेर्यांचा डिव्हीआर पळवून नेला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, शाहुपुरी व शहापूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इकॉम एक्सप्रेस प्रा. लि. या कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. ही दोन्ही कार्यालयाच्या दरवाज्याची 13 जूनच्या मध्यरात्री अज्ञाताने तोडफोड करुन, या कार्यालयातील दोन लाखांची रोकड पळवून नेली होती. या चोरीची नोंद या दोन्ही पोलीस ठाण्यात झाली आहे. या चोरीच्या तपासाबाबत शाहुपुरी व शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाबरोबर स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेने समात्तंर तपास सुरु केला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे हवालदार अर्जुन बंद्रे, नितीन चोथे या दोघांना इकॉम एक्सप्रेस प्रा.लि. या कुरिअर कंपनीच्या कार्यालयात झालेली चोरी खंडाळा येथील (जि. सातारा) संभाजी चौकातील समर्थविश्व अपार्टमेंटमध्ये राहणारा बबन जाधव याने केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्याचा शोध सुरु केला असता तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो शनिवारी (6 जुलै) कारमधून पुणे-बेंगळुरु महामार्गाने कोल्हापूरला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी तावडे हॉटेल परिसरात सापळा लावून पकडले.

सराईत चोरटा बबन जाधव याच्या ताब्यातील सिटी होंडा कारची झडती घेतली असता पोलिसांना घरफोडय़ा करण्यासाठी लावणार्या वेगवेगळ्या कटावण्या, 50 हजारांची रोकड, एक एलईडी टीव्ही संच मिळून आला. याविषयी पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने हा मुद्देमाल चोरीचा असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथिदार सतीश चव्हाण याच्या मदतीने कोल्हापूर जिह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड या सहा जिह्यातील 14 ठिकाणाचे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर या चोरीतील 5 लाख 93 हजारांची रोकड घरामध्ये असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून रोकड जप्त केली.  

त्याने अशा केल्या चोर्या

रेकॉर्डवरील गुन्हेगार बबन जाधव व त्याचा साथिदार सतीश चव्हाण या दोघांनी मिळून कोल्हापूर व रत्नागिरी जिह्यात प्रत्येकी – 2, सांगली व रायगड जिह्यामध्ये प्रत्येकी – 1 आणि सातारा जिह्यात – 3 व पुणे जिह्यामध्ये – 5 असा 14 ठिकाणी कुरिअर कंपनीची कार्यालय फोडून त्यातील रोकडीवर डल्ला मारला असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

विकलेल्या सिटी होंडा कारचीच चोरी

गुन्हेगार बबन जाधव याने काही महिन्यापूर्वी वापरत असलेली होंडा सिटी कार फलटण (जि. सातारा) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणार्या एका व्यक्तीला विकली. या विकलेल्या होंडा सिटी कारची त्याने काही दिवसापूर्वी चोरी केली. या कारचा वापर त्याने कुरिअर कंपनीची कार्यालये फोडण्यासाठी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तसेच ही कार चोरीस गेल्याविषयी फलटण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

इकॉमच्या 18 कार्यालयातील चोरीचा तपास सुरु

इकॉम एक्सप्रेस प्रा.लि. या कुरिअर कंपनीच्या राज्यातील 18 कार्यालयात आतापर्यत चोर्या झाल्या आहेत. त्या सर्व चोर्या गुन्हेगार बबन जाधव व त्याचा पसार साथिदार सतीश चव्हाण या दोघांनी केल्यात काय ? या दिशेने पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिली.