|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोरवणेतील साडेतीनशे लोकांना स्थलांतराच्या नोटीसा!

मोरवणेतील साडेतीनशे लोकांना स्थलांतराच्या नोटीसा! 

प्रतिनिधी/ चिपळूण

  तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर खबरदारीची उपायोजना म्हणून मोरवणे  धरण पायथ्याशी वसलेल्या साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थलांतराच्या नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मंगळवारपासून धरणातील पाणी सोडण्यासही सुरूवात झाली आहे. दरम्यान,  दळवटणेतही तीन वाडय़ांतील लोकवस्तीला दक्षतेच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

 तिवरे धरणाच्या तिप्पट पाणी साठवण क्षमता असलेले लघुपाटबंधारे विभागाचे मोरवणे धरण 2000 मध्ये पूर्ण झाले. या धरणाच्या आऊटलेटच्या वरच्या बाजूस सध्या गळती लागली आहे. भिंतीवर झाडेझुडुपे उगवली सांडव्याच्या एका बाजूकडील भिंत तुटली आहे. धरणाच्या मधोमध असणाऱया जॅकवेलला गळती लागल्याने धरण धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 2005मध्ये धरणाची भिंत खचल्यावर थोडी दुरुस्ती झाली. मात्र धरणाच्या एका बाजूकडील पिचिंग संबंधित ठेकेदाराने केलेले नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धरणाला लागलेल्या गळतीने ग्रामस्थांत घबराट पसरलेली असून ग्रामस्थ रात्र जागवत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी धरणस्थळी भेट देऊन कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मंगळवारी आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार देसाई यांनी धरणावर 24 तास सुरक्षारक्षक नियुक्त करावा, धरण भिंतीवरील झाडी तोडण्यात यावी, गाव परिसराचा आपत्कालीन आराखडा तयार करावा. तसेच पुर्वसूचना दल नियुक्त करण्यात यावे, धरणातील पाणी कालव्याद्वारे सोडताना जेसीबीने कालवे मोकळे करण्यात यावेत, अशा सूचना पाटबंधारे तसेच ग्रामपंचायतीला केल्या आहेत.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांशी केलेली चर्चा आणि तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून धरण क्षेत्र परिसरातील   बौध्दवाडी, चर्मकारवाडी, खालचीवाडीतील सुमारे साडेतीनशेहून अधिक लोकांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. तर जवळच्या दळवटणेतील नलावडेवाडी, बडदेवाडी, भुवडवाडी, बौध्दवाडीतील सुमारे 300हून अधिक लोकवस्तीला दक्षतेच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार देसाई यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

साफसफाई सुरू

तहसीलदारांनी सूचना केल्यानुसार बुधवारी धरण भिंतीवर उगवलेली झाडे-झुडपे तसेच मोठे वृक्ष तोडून साफसफाईच्या कामाला सुरूवात झाली.  मंगळवारपासून धरणातील पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी आरपीआयचे राजू जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष समीर काझी यांच्यासमवेत धरणस्थळी भेट देऊन तेथील माजी सरपंच चंद्रकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली व लवकरच अधिकारी व ग्रामस्थ यांच्याबरोबर गावात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.