|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण

क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

येत्या 17 जुलैपासून यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या हंगामाला फुटबॉल स्पर्धेने प्रारंभ होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांचे नेटकेपणाने आयोजन केले जात असतानाच स्पर्धांमधील विजेत्या व उपविजेत्या संघांना स्पर्धास्थळीच प्रमाणपत्रे देण्याचे नियोजन केले आहे. तसेच गतवर्षाप्रमाणे यंदाही स्पर्धांसाठी खेळाडूंची ऑनलाईनच नेंदणी केली जाणार आहे. तेव्हा खेळाडूंनी नोंदणीसाठी लागणाऱया कागदपत्रांची तयारी ठेवावी. तसेच जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनाही विविध खेळात सहभागी होण्यास क्रीडा शिक्षकांनी प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) डॉ चंद्रशेखर साखरे यांनी मंगळवारी केले. 

 जिल्हा क्रीडा कार्यलय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा शिक्षक सहविचार सभेत ते बोलत होते. सभेला जिह्यातून 214 क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी आशियाई चषक बायथल व ट्राईथल स्पर्धेत 4 रौप्य पदक मिळविलेल्या कोल्हापूरच्या अहिल्या चव्हाण हिचा डॉ. साखरे यांच्या हस्ते सत्कार केला. यानंतर क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, प्रा. संतोष कुंडले, गौरव खामकर यांनी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू व संघांची ऑनलाईन प्रवेशिका कशी भरायची याची माहिती सांगितली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शहर, तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून सर्वाधिक गुणांकन मिळविणाऱया शाळा अथवा ज्युनिअर कॉलेजला 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच गुणांकनासह दुसऱयास्थानी राहणाऱया शाळा अथवा कॉलेजला 75 हजार तर तिसऱयास्थानी राहणाऱया शाळा अथवा ज्युनिअर कॉलेजला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल,  असेही बरबडे यांनी सांगितले. यानंतर फिजिओथेरपिस्ट डॉ. किशोर देशपांडे यांनी स्पर्धेतील सामना खेळताना विद्यार्थ्यांना अचानक दुखापत झाल्यास त्यावर तातडीने कोणते उपचार करावेत, याची माहिती दिली. गंभीर दुखापत असल्यास विद्यार्थ्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करा, असेही डॉ. देशपांडे यांनी सुचित केले.