|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अजिंक्यतारा सूत गिरणीत बसणार अत्याधुनिक मशिनरी

अजिंक्यतारा सूत गिरणीत बसणार अत्याधुनिक मशिनरी 

सातारा :

अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीने दर्जेदार कामकाजातून एक वेगळाच आदर्श सहकारी सूत गिरण्यांपुढे निर्माण केला आहे. आज अजिंक्यतारा सूत गिरणीत 14 हजार 400 चात्यांमधुन दररोज 5 हजार किलो सूत उत्पादित केले जात असून हे सूत देशी, परदेशी बाजारपेठेत निर्यातही केले जाते. दरम्यान, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्यतारा सूत गिरणीत अत्याधुनिक मशिनरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मशिनरीमुळे उच्च प्रतिचे सुटींग व फर्निशिंग फॅब्रीक सूत बनवले जाणार असून त्यातून गिरणीला प्रतिकिलो 12 ते 15 रुपये नफा होणार आहे. 

अजिंक्यातारा सूत गिरणीची प्रगतीकडे जोमाने वाटचाल सुरु असून देश, परदेशातील मोठमोठय़ा सुत गिरण्यांप्रमाणेच अजिंक्यतारा सूत गिरणीमध्ये अत्याधुनिक मशिनरी बसवल्यास गिरणीच्या नफ्यात वाढ होईल, या उद्देशाने सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्यतारा सूत गिरणीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर असलेली अत्याधुनिक टि.एफ.ओ. (टु फॉर वन ट्रिस्टर) ही मशिनरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मशिनरीची माहिती घेण्यासाठी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी नुकतीच जर्मनी येथे जावून संबंधीत कंपन्यांना भेट दिली असून या मशिनरीबाबतची माहिती घेतली आहे. टि.एफ.ओ. या अत्याधुनिक मशिनवर दोन धाग्यांचे रुपांतर एका धाग्यामध्ये केले जाते. या धाग्याला डबल यार्न असे संबोधले जाते. 

या नवीन मशिनरीमधून निर्माण होणारा धागा प्रामुख्याने उच्च प्रतिचे सुटींग आणि फर्निशिंग फॅब्रीक बनवण्यासाठी वापरला जातो. देशात आणि परदेशी बाजारपेठेत या धाग्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच ही मशिनरी अजिंक्यतारा सूत गिरणीमध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून रोजचे 2 हजार 500 किलो डबल केलेले टि.एफ.ओ. सूतसाठी पाच टि.एफ.ओ. मशिन व एक प्रिसीझन वायडींग मशिन आवश्यक आहे. ही अत्याधुनिक मशिनरी सूत गिरणीमध्ये बसवल्यानंतर दोन धाग्यांचे रुपांतर एका धाग्यामध्ये असे प्रतिदिन 2 हजार 500 किलो उच्च प्रतिचे सूत उत्पादन होणार आहे आणि या सुताच्या निर्मीतीतून सूत गिरणीला प्रति किलो 12 ते 15 रुपये फायदा होणार आहे.