|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय सैन्याने सादर केले उदाहरण

भारतीय सैन्याने सादर केले उदाहरण 

श्रीनगर  / वृत्तसंस्था :

माणुसकीचे उदाहरण सादर करत निश्चित प्रक्रिया बाजूला करत भारतीय सैन्याने 8 वर्षीय मुलाचा मृतदेह पाकिस्तानला सोपविला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील बेपत्ता मुलाचा मृतदेह बांदीपुरा जिल्हय़ातील गुरेज येथे किशनगंगा नदीपात्रात आढळून आला होता. मृत मुलाचे नाव आबिद शेख असून त्याच्या आईवडिलांनी भारतीय अधिकाऱयांना मृतदेह सोपविण्याचे आवाहन केले होते.

काही स्थानिक लोकांना गुरेजच्या अचूरा गावातील किशनगंगा नदीपात्रात मुलाचा मृतदेह तरंगताना दिसून आला होता. भारतीय सैनिकांनी मृतदेह बाहेर काढत त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आबिदचा मृतदेह नदीत वाहून भारतीय सीमेत दाखल झाला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानला हॉटलाईनवर याची माहिती दिली असता संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी मृतदेह सोपविण्याचे आवाहन समाजमाध्यमांवरून केले होते.

मानवीय आधारावर तत्काळ प्रक्रिया पूर्ण करत भारतीय सैन्याने मृतदेह सोपविण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय सैन्याने मृतदेह सोपविल्यानंतर संबंधित मुलाच्या आईवडिलांनी आभार मानले आहेत.