|Sunday, October 20, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय वेटलिफ्टर जेरेमीचा विश्वविक्रम

भारतीय वेटलिफ्टर जेरेमीचा विश्वविक्रम 

वृत्तसंस्था /सामोआ :

येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा 16 वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लाल  रिनुंगाने 67 किलो वजन गटात लिफ्टमध्ये 136 किलो वजन उचलत नवा युवा विश्वविक्रम नोंदविला. त्याने या प्रकारात यापूर्वी नोंदविलेला युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम मोडीत काढला.

या स्पर्धेतील गुरूवारी तिसऱया दिवशी युवा ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारतीय वेटलिफ्टर जेरेमीने 67 किलो वजन गटात लिफ्टमध्ये 136 किलो वजन उचलत नवा विश्वविक्रम केला. मात्र त्याला क्लिन आणि जर्कमध्ये विश्वविक्रम करता आला नाही. यापूर्वी चीनमधील निंगबो येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत जेरेमीने 134 किलो वजन उचलत विक्रम केला होता. जेरेमीने सामोआ येथील स्पर्धेत स्वत:चा विक्रम मागे टाकला.

या स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी चांगली कामगिरी केली असून आतापर्यंत चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य अशी एकूण सात पदके मिळविली आहेत. वरिष्ठ आणि कनिष्ठ पुरूषांच्या 73 किलो वजन गटात भारताच्या अचिंता शेलुईने क्लिन आणि जर्कमध्ये 136 तर लिफ्टमध्ये 169 असे एकूण 305 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या विभागात भारताच्या मनप्रित कौरने 76 किलो वजन गटात एकूण 207 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा विविध गटात वेटलिफ्टींग हा क्रीडा प्रकार घेतला जात असल्याने भारताला या स्पर्धेत अधिक पदके मिळविण्याची संधी मिळाली आहे.