|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘गोवा फॉरवर्ड’ विलीन होणार नाही

‘गोवा फॉरवर्ड’ विलीन होणार नाही 

प्रतिनिधी /मडगाव :

गोवा फॉरवर्ड पक्ष कुणामध्येही विलीन केला जाणार नसून हा पक्ष आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवणार आहे. गोवा फॉरवर्ड हा बाजारात विकण्याची वा खरेदी करण्याची वस्तू नव्हे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी गुरुवारी मडगाव पालिकेतील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गोवा फॉरवर्डच्या आमदारांची मंत्रिपदे काढून घेतली जाणार अशी चर्चा सध्या चालू आहे हे नजरेस आणून दिले असता, त्याविषयी आधी भाजपाला काय तो निर्णय घेऊ द्या, असे उत्तर त्यांनी दिले.

काँग्रेसचे दहा आमदार फुटून भाजपात सामिल झाले असून तसे गोवा फॉरवर्डनेही करण्यासाठी दबाव आहे का असे विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. राज्यातील सध्याचे आघाडी सरकार सत्तेवर आणण्यात आम्ही मुख्य भूमिका निभावलेली आहे. आम्ही ‘रालोआ’चे अजूनही सदस्य आहोत. आता आघाडीत आमची भूमिका काय हे वरिष्ठ भागीदार असलेल्या भाजपाने स्पष्ट करायचे आहे, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली.