|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ जोडगोळीकडून 39 मोबाईल जप्त

‘त्या’ जोडगोळीकडून 39 मोबाईल जप्त 

प्रतिनिधी /बेळगाव:

रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱया एका जोडगोळीला गेल्या पाच दिवसांपूर्वी बेळगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या जवळून 39 मोबाईलसह पाऊने तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या जोडगोळीने बेळगावसह राज्यातील विविध भागांत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

मारुती उर्फ राजू भगवंत बजंत्री (वय 24, मुळचा रा. घटप्रभा. ता. गोकाक, सध्या रा. नेलमंगल, बेंगळूर), हुकुमसिंग चरणसिंग राणा (वय 21, रा. नेलमंगल, बेंगळूर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघा जणांना 41(1)(डी), 102 सीआरपीसी व भा.दं.वि. 379 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हुबळी येथील रेल्वेचे पोलीस उपअधिक्षक बी. बी. पाटील, मंडल पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश टी., बी. बी. बंडीवड्डर, मंजुनाथराव एम. बी., प्रभू गोणे, सुरेंद्र, भीमाप्पा, संगाप्पा, रुदाप्पा आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली असून या जोडगोळीने रेल्वेत चोरलेले मोबाईल बेंगळूर परिसरात विकले होते.

मारुती व हुकुमसिंग यांच्याकडून वेगवेगळय़ा कंपन्यांचे 39 मोबाईल संच, 11 ग्रॅम 570 मिली सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 2 लाख 70 हजार 560 रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.