|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणात चोरटय़ांकडून मंदिरे लक्ष्य

मालवणात चोरटय़ांकडून मंदिरे लक्ष्य 

हडी, कांदळगावमधील घटना : चार मंदिरांतील फंडपेटय़ा फोडल्या : दोन स्टॉलमध्येही चोरी

प्रतिनिधी / मालवण:

 मालवण तालुक्यातील हडी आणि कांदळगाव येथील मंदिरांतील दानपेटय़ा आणि मंदिरालगत असलेले स्टॉल अज्ञात चोरटय़ांनी शुक्रवारी रात्री फोडले. यात सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रक्कम लंपास झाल्याचा अंदाज आहे. कांदळगाव रामेश्वर मंदिर परिसरात सीसीटिव्ही कार्यरत असतानाही चोरटय़ांनी मंदिराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला होता. तर हडी येथील प्रसिद्ध कालिका मंदिर मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर दाटवस्तीत असतानाही चोरटय़ांनी त्याठिकाणच्या तीन फंडपेटय़ा फोडल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे. एका रात्रीत चार मंदिरे आणि दोन स्टॉल चोरटय़ांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.

जिल्हय़ात काही ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतानाच चोरटय़ांनी आता आपला मोर्चा मालवण तालुक्मयाकडे वळवला असून मंदिरे व दुकाने यांना आपले लक्ष्य बनविले. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी कांदळगावातील दोन मंदिरे व एक स्टॉल आणि हडी येथील दोन मंदिरे व एक स्टॉल याठिकाणी चोऱया केल्या. लोकवस्तीत असलेल्या ठिकाणांच्या मंदिरांच्या दानपेटय़ा फोडण्यात आल्याने चोरटे सराईत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कांदळगाव येथील ऐतिहासिक श्री देव रामेश्वर आणि हडी येथील श्री देवी कालिका मंदिर ही दोन्ही देवस्थाने प्रसिद्ध असल्याने त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भाविकांची ये-जा असते. अशामुळे चोरटय़ांनी ही मंदिरे लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

रामेश्वर मंदिराची फंडपेटी निघालीच नाही

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर या प्रसिद्ध मंदिराला लक्ष्य केले. मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आयोजित भजन कार्यक्रम आटोपल्यावर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी बाबी गुरव हे मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून घरी गेले होते. मात्र सकाळी गोपाळ गुरव हे मंदिराचे दर्शनी प्रवेशद्वार उघडून आत आले असता त्यांना मंदिराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केल्याचे लक्षात आले. मागील बाजूच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही दरवाजांची कुलूपे तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला होता. मंदिराच्या गाभाऱयाच्या शेजारी असणारी दानपेटी उचलून बाहेर नेऊन फोडण्याचा चोरटय़ांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले, मात्र फंडपेटी बंदिस्त असल्याने चोरटय़ांचा प्रयत्न फसला. तर दरवाजाची तोडलेली कुलूपे मागील बाजूच्या झाडाझुडुपात टाकलेली स्थानिक ग्रामस्थांना आढळून आली.

सीसीटिव्ही असूनही नसल्यासारखे

कांदळगाव रामेश्वर मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असले, तरी चित्रीकरण सेव्ह होत नसल्याने रात्रीच्या वेळचे चित्रीकरण उपलब्ध होऊ शकले नव्हते. याबाबत पोलिसांनी मंदिराची पाहणी केली. कांदळगाव येथेच रामेश्वर मंदिराच्या अलीकडे असणाऱया राजन रामचंद्र लाड यांच्या सलूनवरही चोरटय़ांनी डल्ला मारत दुकानातील रोकड व चिल्लर असे मिळून सुमारे अडीच हजार रुपये चोरून नेले. तर कांदळगावमध्येच असणाऱया श्री कमरा देवीच्या मंदिरातील दानपेटीही चोरटय़ांनी फोडून त्यातील रक्कम चोरून नेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मंदिरातील दोन फंडपेटय़ा उचलून नेल्या

हडी येथील श्री देवी कालिका मंदिरातील तीन दानपेटी फोडून चोरटय़ांनी सुमारे दहा हजार रुपयांची रोकड लांबवली. कालिका मंदिरातही आषाढी एकादशीनिमित्त रात्रीपर्यंत भाविकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे मंदिराच्या मंडळींकडून गाभाऱयाच्या दरवाजाला कुलुप करण्याचे राहून गेले, असे बोलले जात आहे. याचाच फायदा घेत मध्यरात्री आलेल्या चोरटय़ांनी गाभाऱयात प्रवेश करून तेथे असलेल्या दोन मोठय़ा दानपेटय़ा मंदिराबाहेर आणून त्यांचे दरवाजे फोडून त्यातील सुमारे दहा हजार नोटांच्या स्वरुपातील रोख रक्कम लंपास केली. या दोन्ही दानपेटय़ा मंदिराबाहेरील कम्पाऊंडच्या बाहेर टाकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आल्या. दोन्ही दानपेटय़ांमधील चिल्लर चोरटय़ांनी तिथेच टाकली होती. तर पेटय़ांच्या बाजूला पेटय़ा फोडण्यासाठी वापरलेला मोठा दगडही आढळून आला. हडी सुर्वेवाडी येथील श्री गणेश मंदिरालाही चोरटय़ांनी लक्ष्य बनवून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. तर मंदिरालगत असणाऱया गिरीधर सुर्वे यांचा स्टॉलही चोरटय़ांनी फोडला. मात्र त्यात चोरटय़ांच्या हाती काही लागले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

गॉगल अन् स्टील रिंग सापडली

हडी कालिका मंदिरात चोरटय़ांचा एक गॉगल व एक बोटातील स्टील रिंगही आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी याठिकाणी पाहणी करीत दोन्ही वस्तू ताब्यात घेतल्या. तालुक्मयात एकाच रात्री सहा ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या चोऱयांबाबत पोलिसांकडून पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे. या चोरटय़ांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

Related posts: