|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » फायनल्समध्ये भिडण्यापूर्वी…

फायनल्समध्ये भिडण्यापूर्वी… 

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज यजमान इंग्लंड व न्यूझीलंड जेतेपदासाठी आमनेसामने झुंजतील, त्याचवेळी या स्पर्धेतील नवा विजेता कोण असेल, हे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, दोन्ही संघ आमनेसामने भिडण्यापूर्वी या लढतीचे वैशिष्टय़े काय असतील, कोणते विक्रम मोडले जाऊ शकतात आणि कोणते खेळाडू स्टार ठरु शकतात, त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.

सामन्याची ठळक वैशिष्टय़े

@इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या मागील 9 लढतींपैकी 7 लढती जिंकल्या आहेत. यात या विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्याचा देखील समावेश आहे. डरहॅम येथे झालेला हा सामना इंग्लंडने 18 धावांनी जिंकला होता.

@इंग्लंडने या विश्वचषकात न्यूझीलंडला नमवले असले तरी त्यापूर्वी 1983 नंतर ते न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकू शकले नव्हते. या कालावधीत विश्वचषक स्पर्धेत त्यांना सलग पाच पराभव स्वीकारावे लागले होते.

@इंग्लंडचा संघ 1992 नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे तर न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. 4 वर्षांपूर्वी वर्ल्डकपच्या मागील आवृत्तीत ते प्रथमच फायनलमध्ये पोहोचले. पण, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात दिली होती.

@इंग्लंड व न्यूझीलंड या दोन्ही देशांना आजवर क्रिकेटचा विश्वचषक एकदाही जिंकता आलेला नाही. त्यामुळे, आज विश्वचषक स्पर्धेला नवा विजेता मिळणार, हे निश्चित आहे. कोणत्याही कारणामुळे सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते असतील. या परिस्थितीतही स्पर्धेला नवा जेताच लाभणार आहे. जो जिंकेल, तो विश्वचषक जिंकणारा आजवरचा सहावा संघ असणार आहे.

@आश्चर्य म्हणजे इंग्लंडच्या महिला संघाने 2017 साली आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्याची पुनरावृत्ती आता त्यांच्या पुरुष संघाला करायची आहे. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडच्या महिला संघाने लॉर्डसवर झालेल्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाला 9 धावांच्या निसटत्या फरकाने नमवले होते.

@लॉर्डस्वर आजवर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात दोन सामने झाले असून हे दोन्ही सामने न्यूझीलंडनेच जिंकले आहेत. त्यांनी 2008 साली 51 धावांनी तर 2013 साली 5 धावांनी विजय संपादन केला होता.

@इंग्लंडने आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील एखादा सामना लॉर्डसवर खेळण्याची ही फक्त सातवी वेळ असेल. यापूर्वी 6 सामन्यात इंग्लंडने 4 विजय संपादन केले आहेत. पण, या हंगामात लॉर्डसवर झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना 64 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

@न्यूझीलंडने लॉर्ड्सवर मागील सलग तीन लढती जिंकल्या होत्या. पण, यंदा साखळी सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 86 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता.

@यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने इंग्लंडपेक्षा एक सामना कमी खेळलेला आहे. (भारत-न्यूझीलंड यांच्यातील नॉटिंगहम येथील साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता). तरीही इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा 1 हजार धावा अधिक केल्या आहेत. याशिवाय, इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा 100 पेक्षा अधिक चौकार तर 53 षटकार अधिक लगावले आहेत.

@आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील मागील 5 फायनल्समध्ये चार वेळा नाणेफेक जिंकणारा संघच पराभूत झाला आहे. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने लंकेला फायनलमध्ये नमवले, हा याला एकमेव अपवाद ठरला आहे.

@आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱया संघाने 300 पेक्षा धावा करण्याचा पराक्रम आजवर एकदाच नोंदवला गेला आहे. 2003 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 2 बाद 359 धावांचा डोंगर रचला होता. अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या खात्यावर आहे. 2011 फायनलमध्ये भारताने लंकेविरुद्ध 4 बाद 277 धावा जमवत विश्वचषकाचे जेतेपद संपादन केले होते.

@मार्टिन गप्टीलने इंग्लंडमध्ये 2013 साली पहिला सामना खेळला तो लॉर्डसवरच. त्या लढतीत त्याने नाबाद 103 धावांची शतकी खेळी साकारली होती. आश्चर्य म्हणजे त्यानंतर दोनच दिवसांच्या अंतराने साऊदम्प्टनमध्ये झालेल्या पुढील वनडे लढतीत आणखी एक आक्रमक शतक झळकावत चक्क नाबाद 189 धावा फटकावल्या.

@जोफ्रा आर्चर व मार्क वूड या इंग्लंडच्या जलद गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंवर या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेतले आहेत. अशा उसळत्या माऱयावर आर्चरने 10 तर मार्क वूडने 6 बळी घेतले आहेत.

@यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 338 चेंडू निर्धाव टाकले आहेत. याशिवाय, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 320 निर्धाव चेंडूंसह तिसऱया स्थानी विराजमान आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा 323 निर्धाव चेंडूंसह या यादीत सध्या दुसरा क्रमांक लागतो.

@इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर या विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही षटकार खेचला गेलेला नाही. या विश्वचषक हंगामात 30 पेक्षा अधिक षटके टाकणाऱया 59 गोलंदाजांच्या यादीत एकही षटकार खेचला न गेलेला तो आतापर्यंतचा एकमेव गोलंदाज ठरला आहे.

@आजवर इंग्लंडच्या कोणत्याही गोलंदाजाच्या तुलनेत जोफ्रा आर्चर व मार्क वूड या दोन्ही गोलंदाजांनी यंदाच्या विश्वचषकात अधिक बळी घेतले आहेत. सध्या आर्चरच्या खात्यावर 19 तर मार्क वूडच्या खात्यावर 17 बळी आहेत. इंग्लंडतर्फे एकाच विश्वचषकात सर्वाधिक बळीचा विक्रम यापूर्वी इयान बोथमच्या खात्यावर होता. बोथमने 1992 मधील विश्वचषकात 16 बळी घेतले होते.

@इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी उपांत्य लढत जिंकली त्यावेळी, इऑन मॉर्गन व जो रुट यांनी वनडे क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावांची 20 वी भागीदारी साकारली. इंग्लंडतर्फे हा सर्वोच्च विक्रम आहे. यापूर्वी रॉय व बेअरस्टो तसेच बेल व कूक यांनी प्रत्येकी 19 वेळा अर्धशतकी भागीदारी साकारली होती.

@इंग्लंडने 1980 नंतर प्रथमच सलग तीन वनडे सामन्यात 100 व त्याहून अधिक धावांची सलामी दिली आहे. सलग चौथ्यांदा ते आजवर एकदाही शतकी भागीदारी झळकावू शकले नाहीत.

@केन विल्यम्सनने यंदाच्या विश्वचषक हंगामात 548 धावा केल्या, हा न्यूझीलंड संघातर्फे विक्रम आहे. दुसरीकडे, इंग्लिश संघातर्फेही जो रुटने देखील असाच विक्रम प्रस्थापित केला. रुटच्या खात्यावर फायनलपूर्वी 549 धावा आहेत. 

@इयॉन मॉर्गनने या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 22 षटकार खेचले आहेत. वर्ल्डकप इतिहासातील एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकारांचा विक्रम सध्या ख्रिस गेलच्या खात्यावर आहे. त्याने 2015 साली 26 षटकार खेचले होते.

@यंदाच्या विश्वचषकात वैयक्तिक 500 धावांचा माईलस्टोन साजरा करणारा सातवा खेळाडू ठरण्यासाठी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला केवळ चार धावांची गरज आहे. हाच माईलस्टोन गाठण्यापासून जेसॉन रॉयला 74 धावांची आवश्यकता आहे.

@आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 1 हजार धावांचा माईलस्टोन सर करत स्टीफन फ्लेमिंगच्या पंक्तीत दाखल होण्याची संधी रॉस टेलर व मार्टिन गप्टील यांना असेल. रॉस टेलरने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 987 तर गप्टीलने 976 धावा केल्या आहेत. हाच माईलस्टोन गाठण्यासाठी केन विल्यम्सनला अद्याप 119 धावांची गरज आहे. न्यूझीलंडतर्फे वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम स्टीफन फ्लेमिंगच्या खात्यावर असून फ्लेमिंगने 1075 धावा फटकावल्या आहेत.

Related posts: