|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमचे दुर्लक्ष बेततेय जीवावर

हेस्कॉमचे दुर्लक्ष बेततेय जीवावर 

प्रतिनिधी /निपाणी :

निपाणी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या अत्यंत खालच्या अंतरावरून लोंबकळत असल्याचे दिसत आहे. तर तुटलेल्या ताराही त्वरित जोडण्याकडे हेस्कॉमकडून दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्षच शेतकऱयांसह नागरिकांच्या जीवावर बेतत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

आडी येथे चार दिवसांपूर्वी शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकऱयाचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे मृत्यूच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तसेच शॉर्टसर्कीटने शेकडो एकर ऊसही जळाला आहे. अशा घटनांकडे हेस्कॉमच्या निपाणी उपविभागाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. उन्हाळय़ात विद्युत तारा प्रसरण पाऊन ताण कमी पडल्याने लोंबकळतात. अशावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या तारा ओढण्याकडे हेस्कॉमने लक्ष दिलेले नाही.

तसेच कोसळलेले विद्युतखांब, जळलेले ट्रान्स्फॉर्मर बदलण्याकडेही तत्काळ लक्ष न देता दिरंगाई लावली जाते. याउलट वरकमाई मिळेल अशा ठिकाणी तत्काळ विद्युत दुरुस्तीची कामे हाती घेतली जात असल्याचा आरोपही होत आहे. हेस्कॉमकडून गावोगावी नेमलेले वायरमन हे अनेकदा गावाकडे फिरकतच नाहीत. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखलही लवकर घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ठिकाणी तत्काळ दुरुस्तीकामे हाती घ्यावीत. कामचुकारपणा करणाऱया वायरमनवर कारवाई करावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.

नागरिकांनी संपर्क साधावा

हेस्कॉमच्यावतीने गेल्या 15 दिवसांपासून दुरुस्तीकामे हाती घेतली जात आहेत. आडी येथे विद्युत तार तुटल्याचे कोणीही सांगितले नसल्याने तेथे दुरुस्ती होऊ शकली नाही. मात्र अन्य ठिकाणी दुरुस्तीसाठी 24 तास यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनीही तक्रारी असल्यास संबंधित वायरमन, सेक्शन ऑफीसर अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे हेस्कॉमच्या निपाणी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

Related posts: