|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रिंगरोडच्या मार्किंगसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले

रिंगरोडच्या मार्किंगसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले 

प्रतिनिधी /बेळगाव :

रिंगरोडच्या मार्किंगसाठी आलेल्या अधिकाऱयांना उभ्या पिकांमधून आम्ही तुम्हाला जाण्यास देणार नाही. रिंगरोडला तर आमचा विरोधच आहे. मात्र, आता आमची पिके असून तुम्हाला मार्किंग करता येणार नाही, असे म्हणत शेतकऱयांनी रिंगरोडच्या मार्किंगसाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांना आणि पोलिसांना पिटाळून लावले. सुपीक जमिनीमधून रस्ता करण्याचा हट्ट सोडा आणि आम्हाला चांगले जीवन जगण्यास द्या, असे संतिबस्तवाड, वाघवडे येथील  शेतकऱयांनी सुनावले आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता वाघवडे आणि संतिबस्तवाड शिवारात पोलीस फौजफाटय़ासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यावेळी शेतकऱयांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत माकृग कज्ञ् देणार नाही, असे त्यांना सुनावले. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. सध्या आमच्या जमिनीमध्ये पिके आहेत. त्यामुळे आम्ही मार्किंग करण्यास तुम्हाला परवानगी देणार नाही, असे सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कुंदरगी यांनी शेतकऱयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यासाठी 3 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन ते अडीच वर्षांत हा रस्ता होणार आहे. तेव्हा तुम्ही सहकार्य करा, असे सांगितले. मात्र, शेतकऱयांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे सुनावले. यावर खासगी दराच्या चारपट नुकसानभरपाई दिली जाणार आहे. एकरी 50 लाखांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाईल, असेही सांगितले. मात्र, शेतकऱयांनी आमची तिबारपिकी जमीन आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे ठणकावले.

यावर कुंदरगी यांनी तुम्ही लेखी म्हणणे प्रांताधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे द्यावे, असे सांगितले. त्यावर शेतकऱयांनी आम्ही म्हणणे तरी देणारच आहे, याचबरोबर या रस्त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. सध्या मार्किंग झाल्यानंतर पुन्हा नोटिसा पाठविणार आहे. त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात करणार असल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले.

यावेळी ऍड. प्रसाद सडेकर, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, महादेव बिर्जे, बाळाराम पाटील, सागर गोन्साल्विस, मारुती होनगेकर, यल्लाप्पा गुजण्णावर, बसवराज सिद्धण्णावर, मोहन वाणी, मधुकर आंबोळकर, शट्टू कोलकार, पिराजी मेलगे, नागेंद्र नाईक, नागव्वा कोलकार, हणमंत जिद्दीमनी, सोमनाथ पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: