|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बेंजामीन नेतान्याहू यांचा नवा विक्रम

बेंजामीन नेतान्याहू यांचा नवा विक्रम 

सर्वाधिक काळ राहिलेले इस्रायलचे पंतप्रधान : डेव्हिड गुरियन यांना टाकले मागे

वृत्तसंस्था/ जेरुसलेम

बेंजामीन नेतान्याहू यांनी सर्वाधिक काळापर्यंत इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम नोंदविला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांना मागे टाकत नेतान्याहू यांनी 20 जुलै रोजी हा मान मिळविला आहे.

इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांचा कार्यकाळ आता 13 वर्षे आणि 127 दिवसांचा झाला असून डेव्हिड यांच्यापेक्षा तो एक दिवसाने अधिक आहे. नेतान्याहू 1996 ते 1999 दरम्यान पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान राहिले होते. पुढील काळात 2009 पासून सातत्याने ते या पदावर आरुढ आहेत. तर गुरियन 1948 ते 1954 आणि 1955 ते 1963 दरम्यान पंतप्रधान राहिले होते.

पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान झालेले नेतान्याहू जनतेत अत्यंत प्रसिद्ध आहेत. पण टीकाकार त्यांना लोकशाहीचे विरोधक मानतात. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या लिकुड पक्षाला सर्वाधिक मते मिळाली असली तरीही संसदेत स्वतःचे बहुमत सिद्ध करण्यास अपयश आले होते. या कारणामुळे इस्रायलमध्ये सप्टेंबरमध्ये पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीत नेतान्याहू यांना माजी पंतप्रधान इहुद बराक यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

2019 च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला मिळालेल्या नेत्रदीपक यशानंतर नेतान्याहू यांनीच सर्वप्रथम हिब्रू भाषेत ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. नेतान्याहू आणि मोदी यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाले आहेत.

Related posts: