|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा बँकेत 98 लाखांचा पीककर्ज गैरव्यवहार

जिल्हा बँकेत 98 लाखांचा पीककर्ज गैरव्यवहार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेत घोटाळा, गैरव्यवहारांची मालिका सुरुच आहे.  बावडा शाखेतील सोने तारण, लक्ष्मीपुरी शाखा, बीड शाखेतील एटीएम कार्ड घोटाळा प्रकरण ताजे असताना आणखी एक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे व पन्हाळा येथे पीककर्ज वाटपात 98 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जिल्हा बँक प्रशासन हडबडले असून दोन निरीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मुकेश पाटील, के. बी. पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या बँक निरीक्षकांची नावे आहेत.

 दरम्यान, निरीक्षक मुकेश पाटील यांनीच शेतकऱयांचे नावे कर्ज दाखवून 10 लाख रूपये तर सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास सोसायटीतील सचिवाने शेतकऱयांनकडून वसुल केलेले 88 लाख रूपये बँकेकडे जमा केले नसताना शेतकऱयांच्या नावे नवीन कर्ज दिल्याचे तपासणीत पुढे आले. तपासणी दरम्यान दोन्ही प्रकरणातील 28 लाख वसुल करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने यांनी दिली.

   या प्रकाराबद्दलची माहिती अशी, शेतकऱयांना कर्ज वाटपात जिल्हा बँक सर्वात पुढे आहे. जिल्हाधिकाऱयांनीही जास्ती जास्त पीक कर्ज वाटप करा, असे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर यंदा जिल्हा बँकेने एक हजार कोटींचा पीककर्ज वाटपाचा टप्पा गाठला आहे. गतवर्षीही जिल्हा बँकेने टार्गेटपेक्षा अधिक पीककर्ज वाटप केले होते. मात्र हे टार्गेट पूर्ण करताना काही त्रुटी राहून गेल्याने गैरव्यवहार झाल्याची तपासणीत पुढे येत आहे.

 जिल्हा बँकेकडून सेवासोसायटय़ांना कर्ज पूरवठा केला जातो. त्यांच्यामार्फत शेतकऱयांना कर्ज वितरित केले जाते. वसुलीही सेवासोसायटी मार्फत केली जाते. या  प्रक्रियेत सेवा सोसायटीचा सचिव आणि जिल्हा बँकेचे निरिक्षक यांची महत्वाची जबाबदारी आहे.  2017-2018 या वर्षात पन्हाळा शाखेतील काही शेतकऱयांच्या नावे 10 लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले होते. 30 जून अखेर नवेजुने करण्याची प्रचलीत पद्धत आहे. जुने कर्ज भरुन घेवून नवीन कर्ज दिले जाते. पन्हाळा शाखेत 10 लाख रुपयांचे कर्ज वसुल न करताच नवीन 10 लाख रुपये वाटप करण्यात आले होते. 31 मार्च नंतरच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. प्रकरणाच्या खोलात गेले असता शाखा निरिक्षक मुकेश पाटील यांनीच शेतकऱयांच्या नावे 10 लाख रुपयांचे बोगस कर्ज टाकून रक्कम उचल केल्याचे समोर आले.

   या प्रकरणा नंतर काही दिवसातच हातकणंगले तालुक्यातील सवार्डे येथील दत्त सोसायटीतील सचिवाने 88 लाख रुपये अशाच पद्धतीने उचल केल्याचे निदर्शनास आले. शेतकऱयांकडून कर्जाची रक्कम वसुल केली मात्र बँककडे जमा केली नाही. उलट त्याच शेतकऱयांना पुन्हा कर्ज देण्यात आले. बँक निरीक्षक के. बी. पाटील यांनीही खातरजमा न करता कर्ज मर्यादा (क. म.) मंजुर करुन कर्ज वाटप केल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही प्रकरणात बँक निरीक्षकांना जबाबदार धरण्यात आले असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

Related posts: