|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तृणमूलकडून ‘दीदी के बोलो’ मोहीम

तृणमूलकडून ‘दीदी के बोलो’ मोहीम 

घरोघरी पक्षाला पोहोचविण्याचा प्रयत्न : 2021 विधानसभा निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ

 

वृत्तसंस्था / कोलकाता

भाजपचा निवडणूक प्रचार, ठोस नियोजन आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना स्वतःसोबत जोडण्यासाठी एक नवी मोहीम सुरू केली आहे. ‘दीदी के बोलो’ म्हणजेच ‘दीदींसोबत बोला’ मोहिमेंतर्गत एक क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. या क्रमांकावर कॉल करून लोक स्वतःची तक्रार नोंदवू शकणार आहेत. तृणमूलचे कार्यकर्ते घरोघरी जात लोकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आगामी 100 दिवसांमध्ये तृणमूलचे 100 कार्यकर्ते गावांमध्ये जातील आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. कुणी, कुठल्या गावात जावे याचा निर्णय पक्ष घेणार असल्याचे ममता म्हणाल्या.

संकेतस्थळाचाही पर्याय

तृणमूलकडून उपलब्ध करण्यात आलेल्या क्रमांकावर कॉल करून लोक स्वतःची समस्या मांडू शकतील. याचबरोबर डब्ल्यूडब्ल्यू डॉट दीदीकेबोलो डॉट कॉम या संकेतस्थळावर लोक स्वतःच्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. एक पथक तक्रारींचे निरीक्षण करत ममता बॅनर्जींना त्याचा तपशील कळविणार आहे. प्रसिद्ध निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे समजते.

उन्नाव प्रकरणाचा उल्लेख

भाजपचे नेते दररोज पश्चिम बंगालवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण उत्तरप्रदेशात काय होतेय? उन्नावमध्ये काय घडले, बलात्कार पीडितेचे दोन नातलग मृत्युमुखी पडले असून पीडितेची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असल्याचे ममतांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

पक्षनेत्यांचा सहभाग

ममतांनी निवडणूक सुधारणांची मागणी उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. प्रत्येक पक्षाची स्थिती भाजपसारखी नाही. माझा पक्ष गरीब असल्याने मला निवडणूक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करावा लागत असल्याचे ममता म्हणाल्या. 2021 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तयारीकरता ममतादीदी पुढील आठवडय़ात पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना भेटणार आहेत.

Related posts: