|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापूर काँग्रेस उमेदवारीवरून गदारोळ

राजापूर काँग्रेस उमेदवारीवरून गदारोळ 

विधानसभेसाठी तब्बल 8 जण इच्छुक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी काँग्रेसभवन येथे पार पडल्या. यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी युवा नेते अजित यशवंतराव यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी एका गटाकडून करण्यात आली, याचवेळी दुसऱया गटाने अविनाश लाड यांच्या नावाचा आग्रह धरल्याने जोरदार गोंधळ झाला.

  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी रत्नागिरीतील काँग्रेसभवनमध्ये पार पडला. यावेळी पक्ष निरीक्षक रमाकांत म्हात्रे, प्रदेश सचिव तौफिक मुलानी, आमदार हुस्नबानु खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कदम, ऍड. अश्विनी आगाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हय़ात विधानसभेचे पाच मतदारसंघ असून त्यातील दापोली, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या चार ठिकाणी काँग्रेसने दावा आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरलेल्या राजापूर विधानसभा मतदार संघातून तब्बल 8 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. याच मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

जिल्हय़ातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्यांकडून काँग्रेस निवड समितीकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात दापोलीतून मुश्ताक मिरकर, चिपळूणसाठी  इब्राहिम दलवाई व अशोक जाधव, रत्नागिरी मतदार संघासाठी दीपक राऊत यांचे अर्ज दाखल झाले होते. तर राजापूर-लांजा मतदार संघातून अविनाश लाड, अजित यशवंतराव, विनय खामकर, आनंद भडेकर, राजेश राणे, सदानंद गांगण, महमदअली वाघू व संजय आयरे यांचा समावेश आहे.

इच्छुक उमेदवारी मुलाखतीवेळी उपस्थित उमेदवार व कार्यकर्त्यांचे मत निवड समितीकडून जाणून घेतले जात होते. यावेळी राजापूरसाठी उपस्थित कार्यकर्त्यांमधून एकीकडे अजित यशंवतराव तर दुसरीकडून अविनाश लाड यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. दोन्ही गटाच्या समर्थकांनी आपल्याच उमेदवाराचे घोडे दामटवण्याचा प्रयत्न केल्याने गेंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीसाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस युवा कार्यकर्ते मंदार सप्रे यांनी यशवंतराव यांना उमेदवारी द्यावी. तरूण उमेदवाराला संधी मिळाल्यास त्याचा फायदा संघटनेला मिळेल, असे स्पष्टपणे सांगितले.

यशवंतरावांची मोर्चेबांधणी

दरम्यान अजित यशंवतराव हे राष्ट्रवादीतील युवा पदाधिकारी आहेत. त्यांनी अद्याप काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र काँग्रेसभवनमध्ये झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केल्याचे दाखवून देत इच्छुकांच्या यादीत नंबर लावला आहे. कोणत्याही परिस्थिती विधानसभा निवडणुक लढवायचीच असा निर्धार यशवंतरा यांनी यापुर्वीच जाहीर केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने व हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला येण्याच्या शक्यतेने त्यांनी काँग्रेसकडूनही मुलाखत दिल्याची चर्चा आहे. मात्र यशवंतराव यांच्या दावेदारीमुळे  राजापूर मतदार संघातील काँग्रेसमध्ये दोन तट पडल्याचे दिसून येत आहेत. त्याचाच प्रत्यय बुधवारच्या उमेदवार मुलाखतींवेळी आला. 

जिल्हय़ातील विधानसभेच्या 4 जागांवर काँग्रेसचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दापोला, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या चार विधानसभा मतदारसंघांवर  काँग्रेसने दावा केल्याचे पक्ष निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात काँग्रेसला चांगले वातावरण असून इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्या बाबतचा अहवाल पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाकडे सादर केला जाणार आहे. 7 ऑगस्ट रोजी प्रदेशच्या बैठकीत उमेदवारीबाबत निर्णय होईल, असे निरीक्षक म्हात्रे यांनी सांगितले.

Related posts: