|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वास्कोतील डेपोतून पेट्रोल-डिझेल उपलब्ध

वास्कोतील डेपोतून पेट्रोल-डिझेल उपलब्ध 

प्रतिनिधी/ कुडाळ

पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे मिरज येथील पेट्रोल-डिझेल डेपोतून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील पेट्रोलपंपांना पेट्रोल मिळणे अवघड झाल्याने अखेर इंडियन ऑईल व भारत पेट्रोलियम कंपनीने सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पंधरा पेट्रोलपंपांना वास्को-गोवा येथील झुवारी डेपोतून पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून दिले.

शनिवारी दुपारी हे टँकर सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे रवाना झाले. दरम्यान, मिरज डेपोकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईपर्यंत वास्को येथून पेट्रोल-डिझेल सिंधुदुर्ग-रत्नागिरीला देण्यात येणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई आता संपुष्टात येणार आहे.

वाहतूक बंद असल्याने मिरज डेपोकडे टँकर जाणे अशक्य असल्याने शुक्रवारी मुंबई येथून पेट्रोल-डिझेल सिंधुदुर्गातील पंपांना देण्यात आले. मात्र, लांबचे अंतर व पाऊस यामुळे मुंबईतून पेट्रोल-डिझेल आणणे त्रासदायक ठरत असल्याने पेट्रोलपंप मालकांनी गोवा येथील डेपोतून पेट्रोल-डिझेल द्यावे, अशी मागणी कंपनीकडे केली. जीएसटीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर शनिवारी वास्को येथील डेपोतून पेट्रोल-डिझेल देण्यात आले.

इंडियन ऑईलचे विक्री अधिकारी राहुल भारद्वाज, ऑपरेशन मॅनेजर एन. पी. गोडे, रवी शर्मा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी व्यवस्थापक कुशाल त्रिपाठी तसेच सिंधुदुर्गातील पेट्रोलपंप मालक रमेश भाट, ओमकार देसाई, सौरभ पाटणकर, गिरीश तोरसकर, विनायक आचरेकर व अन्य यावेळी उपस्थित होते.

देवगड, कुडाळ, मसदे, आंबोली, सावंतवाडी, ओरोस, जानवली, चांदोसी, कट्टा, तळेरे, मालवण, कणकवली येथील इंडियन ऑईल व भारत पेट्रोलियमच्या पंपांना पेट्रोल-डिझेल घेऊन टँकर सिंधुदुर्गकडे मार्गस्थ झाले आहेत.

Related posts: