|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महासंकटाची माघार

महासंकटाची माघार 

कृष्णेचा पूर ओसरू लागला : पाऊस मंदावला : मुख्यमंत्र्यांची कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्राची घोषणा

प्रतिनिधी/ सांगली

गेले पाच दिवस सुरू असलेल्या जलप्रलयाच्या महासंकटाने शनिवारी माघार घेतली. आभाळ गळायचे थांबले. आणि आयर्विनची कृष्णेत बुडलेली मोजपट्टी दिसू लागली. दरम्यान, हवा चांगली असल्याने मुख्यमंत्री सांगलीत उतरले व निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत सांगलीत कायमस्वरूपी आपत्ती निवारण व्यवस्थापन केंद्राची त्यांनी घोषणा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामानंदनगर, वसगडे, सांगली दौरा केला. व पूरग्रस्तांना आधार व धीर दिला. दरम्यान, रस्ते वाहतुकीची कोंडी फुटायला सुरूवात झाली आहे. अजूनही सांगलीवाडी, हरिपूर येथे नागरिक अडकलेले असून बचाव, मदत व औषधोपचाराचे कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 20 तर पूरबळींची संख्या 23 वर गेली आहे.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने आणि आलमट्टीतून विसर्गातून वाढ केल्याने अखेर कृष्णा नदीला आलेल्या महापूराला तब्बल सहा दिवसानंतर उतार सुरू झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून उताराला गती आली असून शनिवारी सायंकाळपर्यंत तीन फुटाने पातळी कमी झाली. पाणीपातळी उतरत असल्याने पाण्याखाली गेलेले आणि रस्ते वाहतुकीला खुले झाले आहेत. दरम्यान, पूराच्या पाण्यात शहरास जिह्यातील अनेक लोक अडकले असून लष्कर व इतर यंत्रणांमार्फत युध्द पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, पूर पाणीपातळी उतरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून सुस्कारा टाकला आहे.

   गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरणक्षेत्रात धुवाँधार पाऊस पडला. अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे तळाला गेलेली धरणे झपाटय़ाने भरली. धरणे भरली तरीही पावसाचा जोर कमी होत नव्हता. यामुळे धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने महापूर आला. कृष्णा आयर्विन सांगलीतील पातळीने विक्रम केला आहे. 2005 च्या महापूरात 53.8 इतकी पूल पातळी झाली होती सध्या 57.8 फुटांवर पातळी गेली. पाणी पुलाला टेकले आहे. या महापुराने सांगली शहरासह मिरज, पलूस, इस्लामपूर आणि शिराळात तालुक्यात हाहाकार उडविला. अनेक रस्ते, धरणे, पूल पाण्याखाली गेले, शहरातील गावभाग, खणभाग, वखारभाग उपनगरे, हरिपूर, सांगलीवाडी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी माळवाडी, भिलवडी, ब्रह्मनाळ, आदीसह सुमारे 45 गावे पाण्याखाली गेली तर दीडशे हून अधिक गावांना पुराची बाधा झाली. पुरामुळे दीड लाखांवर लोकांना स्थलांतर करावे लागले तर दोन लाखांवर लोक स्वत:हून जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले. आजही हजारो लोक पूराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.

पूराने 40 हजारावर हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तर दहाजणांना जीव गमवावा लागला. पूर बाधितांना मदत आणि बचावासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने आणि आलमट्टी धरणातून दुप्पटीने विसर्ग सुरू करण्यात आल्याने अखेर सहा दिवसानंतर पूर ओसण्यास सुरूवात झाली. दोन दिवस पूर पातळी स्थिर
राहिली. शुक्रवारी सकाळपासून इंच-इंचाने पातळी कमी होत गेली. शनिवारी सकाळर्पंत एक फुटाने पातळीत घट झाली. तर शनिवारी दिवसभरात आणखी एक फुटाने पाणी पातळी घटली रविवारी यामध्ये आणखी दोन फुटाची घट होण्याची शक्यता असल्याने पातळी 52-53 फुटापर्यंत खाली येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापूराच्या विळख्यात अडकलेल्यांना पाणीपातळी उतरत असल्याने सुस्कारा टाकला आहे.

शहरात पूर पातळी उतरली
अनेक उपनगरातून पाणी गेले

महापूरामुळे शहरातील अनेक रस्ते आणि चौक पाण्याखाली गेले हेते. सांगलीच्या इतिहासात प्रथमच गणपती मंदिरात पुराचे पाणी आले आहे. याशिवाय जिल्हा कारागृहातही पाणी आले आहे. याशिवाय स्टेशन चौक, आमराई, बायपास, पत्रकारनगर, झुलेलाल चौक, रिसाला रोड, सर्कीट हाऊस रोड, वखारभाग, फौजदार गल्ली, सांगली हायस्कुल, एसएफसी मेगा मॉल, आदी उपनगरे आणि चौकात सात ते आठ फूट पाणी आले आहे. शहरातील मारूती चौत तर दहा ते बारा फूट पाणी आले असून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. पूर पातळीत उतरत असल्याने बंद झालेला सांगली तासगाव रस्ता सुरू झाला. कॉलेज कॉर्नर, बायपास, वखारभार रोड, आंबेडकर रोड, डी-मार्ट, हरिपूर, सांगलीवाडी येथील पाणी कमी झाले.

दीड लाखांवर लोकांचे स्थलांतर

जिह्यातील सुमारे 26 हजार 579 कुटुंबांतील 1 लाख 34 हजार 285 लोक व 30 हजार 692 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील 20 गावांतील 4 हजार 134 कुटुंबांतील 21 हजार 884 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 5 हजार 314 कुटुंबांतील 25 हजार 167 लोक व 6 हजार 196 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 36 गावांतील 12 हजार 215 कुटुंबांतील 65 हजार 383 लोक व 15 हजार 117 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 20 गावांतील 500 कुटुंबांतील 2 हजार 273 लोक व 2 हजार 590 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 19 हजार 578 लोक व 455 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

67 बोटी , तीनशेवर जवान आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत कार्य युध्दपातळीवर

पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी  39 बोटी कार्यरत आहेत. तसेच आजरोजी पर्यंत एनडीआरएफची 8 पथके, 219 जवान व 24 बोटी मिरज व पलूस तालुक्यात कार्यरत आहेत. टेरीटोरियल आर्मी कोल्हापूरची 2 पथके, 66 जवान व 3 बोटी मिरज तालुक्यात कार्यरत आहेत. कोस्ट गार्डचे 1 पथक, 18 जवान व 1 बोट पलूस तालुक्यात कार्यरत आहे. पुणे चिंचवड महानगरपालिकेच्या पथकाची बोट इस्लामपूर येथे कार्यरत आहे. अशा एकूण 12 पथकांची 303 जवानांची व 29 बोटींची मदत पूरस्थिती हाताळण्यात होत आहे. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी 3 पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणच्या 2 पथकांना पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये 4 बोटी व 25 जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी 2 बोटी व 28 जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून 5 बोटी तर करमाळ्यावरून 5 बोटी मागविण्यात आल्या आहेत. 6 टॉर्च, 117 लाईफ जॅकेटस्, 54 लाईफ बॉयज, 8 हेल्मेट्स, 3 दोरखंड, 24 मेगाफोन, 22 लाईटनिंग सिस्टीम्स यांचा समावेश आहे. याशिवाय विशाखापट्टण येथून भारतीय नैदलाची 15 पथके दाखल होणार आहेत.

प्रशासनाची सतर्कता

जिल्हास्तरावर 24 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. तालुका नियंत्रण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित आहे. आपत्कालिन साहित्य, बोटी, लाईफ
जॅकेटस्, लाईफ बॉयज्, फ्लोटिंग पंप, मेगा फोन, बी. ए. सेट, सेफ्टी हेल्मेटस्, टॉर्च इत्यादी साहित्य तालुका स्तरावर तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. पुरेशा औषध साठय़ाबाबत तसेच साथीचे रोग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे.

Related posts: