|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरातील रस्त्यांची प्रचंड दैना

शहरातील रस्त्यांची प्रचंड दैना 

प्रतिनिधी/ सातारा

गेली आठवडाभर संततधार झालेल्या अतिवृष्टीने सातारा शहरातील जन जीवन विस्कळीत झालेच. मात्र, या पावसात सातारा शहर व उपनगरासह सर्वच रस्त्यांवर पडलेल्या असंख्य खड्डय़ांमुळे रस्त्यांची पार दैना उडून गेली आहे. या असंख्य खड्डय़ांतून प्रवास करताना ‘खड्डय़ात नेवून ठेवलाय सातारा माझा’, अशीच प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत असून जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या शहरातील रस्त्यातून वाहनधारक कसरत करत वाहने चालवत आहेत. काही ठिकाणी गत उन्हाळय़ात केले गेलेले रस्ते उखडून गेले असून संबंधित रस्त्यांच्या ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकामंधून होत आहे.

सातारा शहरातील वरचा रस्ता असलेल्या राजपथाची अवस्था राजवाडय़ापर्यंत चांगली आहे. खालच्या रस्त्याची अवस्था पोलीस मुख्यालयापर्यंत चांगली आहे. जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरातील रस्त्याची पार वाट लागली असून शहरातील तिसरा रस्ता असलेल्या राधिका रस्त्याची अनेक ठिकाणी अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांवर पडलेल्या असंख्य खड्डय़ांत पाणी साठून रहात असून तेच पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत वाहनधारक प्रशासनाच्या नावाने लाखोली वाहत प्रवास करत आहेत.

जुन्या आरटीओ रस्त्याची गतवर्षी प्रचंड दुरवस्था झाली होती. त्यावर काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, पुन्हा या पावसाळय़ात ते पाण्यात गेले. या रस्त्यावर शाहू क्रीडा संकुलासमोर पाण्याचे मोठे तळे साचत असून त्यातूनच कसरत करत वाहने चालवण्याची वेळ सातारकरांसह सर्वांवर आली आहे. सध्या सातारा पालिकेकडून या खड्डय़ांमध्ये मुरुम टाकण्याची मोहीम सुरु करण्यात आली. मात्र, पावसामुळे मुरुम देखील वाहून जात असून पालिकेचा खर्च पाण्यातच जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts: