|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली घाटात तात्पुरती डागडुजी

आंबोली घाटात तात्पुरती डागडुजी 

पायाला दगड लागल्यासच संरक्षक भिंतीचा पर्याय शक्य : अन्यथा आणखी काही महिने लागणार

प्रतिनिधी / सावंतवाडी:

आंबोली घाटरस्ता खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यासाठी खाली दगड लावणे आवश्यक आहे. दगड असल्याची चाचपणी करूनच तेथे संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. संरक्षक भिंत उभारतांना आवश्यक दगड न लागल्यास आंबोली घाटरस्ता अवजड वाहनांसाठी सुरळीत होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरून कोकणात गणेश चतुर्थीच्या काळात होणाऱया वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, दगडांअभावी भिंत उभारणे शक्य न झाल्यास अन्य पर्यायांचा विचार सार्वजनिक बांधकाम विभाग करत असून त्यादृष्टीने घाटरस्त्याच्या दुरुस्तीचा
प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाला पाठविणार आहे.

तात्पुरत्या डागडुजीवर नाराजी

सध्या घाटरस्ता खचलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने खडी आणून टाकली आहे. तर रस्ता खचलेल्या अन्य ठिकाणी माती टाकून वर सिमेंट घालून चर बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. केवळ वेळ मारून नेण्याचा हा प्रकार असून त्यामुळे आंबोली ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

बांधकाम विभाग सुस्तच

आंबोली घाटरस्त्याखालचा भाग खचून चार दिवस झाले आहे. त्यामुळे घाटरस्त्यावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तर इतर चारचाकी, दुचाकी वाहतूक सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद आहे. घाटरस्त्यात चारचाकी, दुचाकींची होणारी वाहतूकही खचलेल्या भागाची परिस्थिती पाहता धोकादायक आहे. घाटरस्ता खचून चार दिवस झाले तरी ती सुरळीत करण्यासाठी कोणत्याही हालचाली सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नाहीत. त्या तुलनेत आठ वर्षांपूर्वी सलग दोन वर्षे पडलेल्या दरडींवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसऱया दिवशी रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी दरडी प्रचंड असल्याने वाहतुक सुरळीत होण्यासाठी पंधरा दिवसाहून अधिक काळ लागला होता. त्या तुलनेत आता खचलेला रस्ता पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने चार दिवस कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्याच्या धोक्याची पूर्वकल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असल्याचे संकेत दिसत आहेत.

पायाला दगड मिळाल्यासच संरक्षक भिंत

रविवारी प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले यांनी घाटरस्त्याला भेट दिली. त्यांनी रस्ता सुरळीत करण्यासाठी सूचना केल्या. परंतु खचलेल्या ठिकाणी दगड मिळणे आवश्यक आहे. दगड मिळाल्यास तेथे ड्रिलिंग करून भिंत उभारणे शक्य होणार आहे. अन्यथा भिंत घातल्यास धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभाग खचलेल्या ठिकाणी दगड आहे किंवा नाही, याची चाचपणी करणार आहे. त्यानंतर संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेणार आहे. अन्यथा दुसऱया पर्यायाचा विचारही सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू आहे.

दरम्यान, खचलेल्या काही भागात माती टाकून चर बुजवून त्यावर सिमेंट टाकण्यात येत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. चर सिमेंट टाकून बुजविणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे. आंबोली घाटरस्त्याची परिस्थिती पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या केसरी-फणसवडे रस्त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.

Related posts: