|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग कोकण विकासात महत्वाचा ठरणार!

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग कोकण विकासात महत्वाचा ठरणार! 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची ट्विटरद्वारे माहिती

वार्ताहर / कणकवली:

वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली. सरकारने वैभववाडीपासून कोल्हापूरपर्यंत नवीन रेल्वेलाईन टाकण्यासाठीही मंजुरी दिली आहे. ही नवी रेल्वेलाईन कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वरदान देणारी ठरणार असल्याचे गोयल यांनी म्हटल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. कोकणची आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती या सोबत सुलभ माल वाहतूक, विद्युतनिर्मिती, कोळसा वाहतूक आदींसाठी हा मार्ग महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणच्या विकासाचे एक नवे पर्व सुरू होणार असून तत्कालीन रेल्वेमंत्री  सुरेश प्रभू व जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे या कामात मोठे योगदान आहे. या नव्या रेल्वेलाईनसाठी जठार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडे मागणी करताना जठार यांनी वैभववाडी हे कोल्हापूरशी जोडले पाहिजे आणि पुढे वैभववाडी ते विजयदुर्ग अशी रेल्वेलाईन झाली पाहिजे ही मागणी लावून धरली होती, असे काळसेकर म्हणाले.

बंदरे रेल्वेमार्गाला जोडलेली हवीत!

कोकणचा विकास वेगाने होण्यासाठी नवी अत्याधुनिक बंदरे विकसित व्हायला हवी. पण अशा बंदरांचा विकास व्हायचा असेल, तर त्या बंदरांनाही मोठा उद्योग मिळाला पाहिजे. कोकणात आता मोठे निर्यातक्षम प्रकल्प नाहीत. कच्चा माल आयात होण्यासाठीही असे प्रक्रिया प्रकल्प आवश्यक आहेत. बंदरांना व्यवसाय मिळाला पाहिजे. ही बंदरे रेल्वेमार्गाला जोडलेली असली पाहिजेत. बंदरे फक्त कोकण रेल्वेशीच जोडलेली असून चालणार नाहीत. ती कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, हैदराबाद व अन्य भागांना रेल्वेने जोडली पाहिजेत, असे काळसेकर म्हणाले. कोल्हापुरातून मोठय़ा प्रमाणावर धान्याची वाहतूक ट्रकद्वारे होते. रेल्वेमंत्री असताना प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देणार असल्याची घोषणा केली होती. 

पूरस्थितीमुळे या पर्यायी मार्गाचे महत्व कळले!

कोल्हापूर, सांगली परिसरात जी पूरस्थिती निर्माण झाली, तेव्हा दुसऱया पर्यायी रेल्वेमार्गाचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवले आहे. गॅस, डिझेल, पेट्रोल डेपोंना आज रस्ते मार्गाशिवाय पर्यायी दळणवळण सुविधा नाही हे पूरस्थितीमुळे लक्षात आले. भविष्यात अशा संकटावेळी पश्चिम महाराष्ट्राला वेगळी आणि महत्वाची संपर्क यंत्रणा या रेल्वेमार्गामुळे मिळणार असल्याचे काळसेकर यांनी सांगितले. श्रेयाच्या राजकारणात न अडकता अभ्यासूपणे वेगवेगळे प्रकल्प मांडून त्याचा पाठपुरावा भाजपमार्फत करण्यात येत आहे. वैभववाडी-कोल्हापूर नवी रेल्वेलाईन मंजुरी हे प्रभू व जठार यांच्या दूरदृष्टीचे यश असल्याचे काळसेकर यांनी सांगितले.

Related posts: