|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू

वास्कोत सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू 

प्रतिनिधी/ वास्को

वास्को सप्ताहातील गजबजलेल्या फेरीतील एका सात वर्षीय मुलाचा सोमवारी सकाळी संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे आढळून आले. सदर मुलगा रविवारी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. त्यामुळे रात्री त्याची शोधाशोध सुरू होती. सदर मुलाला इमारतीवरून पडल्याने मृत्यू आल्याचा प्राथमिक अंदाज असून या मागे घातपाताचीही शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुलाच्या कुटुंबानेही घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

वास्कोतील फेरीत स्वातंत्र्यपथ मार्गावरील कोसंबे इमारतीसमोर दरवर्षी विळे, कोयते व इतर अवजारे विक्रीसाठी घेऊन बसणाऱया लोहार जमातीतील एका महिलेला या फेरीच्या निमित्ताने आपल्या सात वर्षीय मुलाला गमवावे लागलेले आहे. ही महिला वास्कोतील मांगोरहिल भागातील असून तिचे नाव रेखा योगेश साळुंके असे आहे. दरवर्षी ती वास्कोतील फेरीत दुकान थाटत असते. रविवारी संध्याकाळीही ती आपल्या मुलासोबत विक्रीसाठी बसली होती. मुलगा एकाच जागी बसून कंटाळा येत असल्याने त्यांच्या फेरीभोवतीच खेळत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिने त्याला आपल्यासमोरच खेळताना पाहिले होते. त्यानंतर मात्र तो दिसलाच नाही. बराच वेळ झाला तरी आपला मुलगा दिसत नसल्याने तिने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने आपले नातेवाई व ओळखीच्याना माहिती दिली व नंतर पोलीस तक्रारही केली.

मृत्यूबाबत वास्कोत पसरला संशय

पोलिसांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घेऊन त्याला शोधण्याचाही प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. त्यानंतरही पोलीस व त्या मुलाचे कुटुंबीय पहाटेपर्यंत शोध घेत राहिले. तरीही त्या मुलाचा ठावठिकाणा लागला नाही. शेवटी सकाळी सातच्या सुमारास मुरगाव पालिकेच्या कोसंबी इमारतीच्यामागे त्या मुलाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृत मुलाच्या अंगावरील चड्डी गायब झाली होती. तो नग्नावस्थेत आढळला. त्यामुळे काल दिवसभर वास्कोत त्या मुलाचे गायब होणे व दुसऱया दिवशी नग्नावस्थेत मृतदेह सापडण्याच्या प्रकाराबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. मुलाच्या मातेनेही आपल्या मुलाचा घातपातच झाला असावा असा संशय व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व दृष्टीकोनातून तपास हाती घेतला. काहींच्या जबान्यांही घेतल्या. मात्र, संशयास्पद असे काहीच धागेदारे पोलिसांच्या हाती लागले नाही.

पडून जखमी झाल्याने मृत्यू आल्याचा अंदाज

पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार सदर बेपत्ता मुलगा कोसंबे इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत मुलगा सात वर्षीय असून तो कोसंबे इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील गच्चीवरून पडल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. तसेच त्याचे पोट व जांघावरही खरचटले होते. शवविच्छेदन होणार असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकते असे उपअधीक्षक सावंत यांनी सांगितले. घातपाताविषयी कोणतेही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र, तरीही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अपघात की घातपात हा प्रश्न अनुत्तरीत

उपलब्ध माहितीनुसार मयत मुलगा वास्कोतील एका शाळेत दुसरीत शिकत होता. जन्माने गोव्यातील असलेली त्याची आई अवजारे विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करते. वडिल बिजापूरमध्ये लहानग्या मुलीसोबत असतात. रविवारीच तो मुलगा आपल्या आईबरोबर फेरीत आला होता. नजरेसमोर खेळणारा मुलगा आपली नजर चुकवून त्या इमारतीच्या गच्चीवर का व कसा गेला याची माहिती त्याची आईसुध्दा देऊ शकत नाही. या मुलाची चड्डी त्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत पडलेली आढळून आली.  त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे बनलेले आहे. त्या इमारतीच्या गच्चीवरून तो अपघाती पडला की त्याला कुणी तरी खाली पाडले असा संशय पसरलेला असला तरी असा कोणताही धागादोरा सापडलेला नाही. कोसंबे इमारत ही मुरगाव पालिकेची इमारत असून तीची अवस्था दयनीय आहे. ज्या ठिकाणी त्या मुलाचा मृतदेह आढळून आला, ते ठिकाण अडगळीचे असून त्या ठिकाणी सहसा कुणी जातही नाही. अन्यथा रविवारी रात्रीच त्या मुलाचा मृतदेह आढळून आला असता.

Related posts: