|Saturday, December 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सिक्कीममध्ये राजकीय भूकंप

सिक्कीममध्ये राजकीय भूकंप 

चामलिंग यांच्या पक्षाचे 10 आमदार भाजपमध्ये : सरकार स्थापन करण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ गंगटोक

सिक्कीम डेमोक्रेटिक प्रंटचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या पक्षाच्या 13 पैकी 10 आमदार मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा आणि महासचिव राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांनी भाजपचे सदस्यत्व ग्रहण केले आहे.

एसडीएफमध्ये आता चामलिंग यांच्यासमवेत 3 आमदारच शिल्लक राहिले आहेत. राज्यात सिक्कीम क्रांतिकारी पक्षाचे सरकार सत्तेवर असून त्याच्याकडे एकूण 16 आमदार आहेत. तर 3 जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत बहुमतासाठी 15 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे.

चामलिंग, त्यांच्या पक्षाचे आमदार डीटी लेपचा आणि सत्तारुढ एसकेएमचे उमेदवार कुंगा नीमा लेपचा यांनी दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. या तिघांनीही प्रत्येकी एका जागेवरील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. सिक्कीम विधानसभेत एकूण 32 जागा असून सध्या 29 आमदार आहेत.

पक्षांतरबंदी कायदा

एसडीएफच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे केंद्रात सरकार सत्तेवर आहे, ईशान्येत सिक्कीम वगळता उर्वरित राज्यांमध्ये आतापर्यंत भाजपची प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी होती. पण आता सिक्कीममध्ये एसडीएफचे आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने तेथेही सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार अन्य पक्षात प्रवेश करत असल्यास त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नसल्याचा दावा माधव यांनी केला आहे.

विक्रमी चामलिंग

पवन चामलिंग हे 1994 ते 2019 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 68 वर्षीय चामलिंग सलग सर्वाधिक काळापर्यंत मुख्यमंत्री (25 वर्षे) राहणारे एकमात्र नेते आहेत. त्यांच्या पक्षाला 6 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सिक्कीम क्रांतिकारी पक्षाने विधानसभा निवडणुकीत पराभूत केले आहे. एसकेएमचे प्रेमसिंग तमांग हे मुख्यमंत्री
आहेत.

Related posts: