|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कैलास मानसरोवराच्या काठावरच भाविकांचा यज्ञ

कैलास मानसरोवराच्या काठावरच भाविकांचा यज्ञ 

वृत्तसंस्था/ गंगटोक

उत्तर भारतीय श्रावण मासाच्या अंतिम सोमवारी हिंदू भाविकांनी कैलास मानसरोवराच्या काठावर यज्ञविधी पार पाडला आहे. कैलास पर्वत चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात येतो. भारतीय भाविक आमच्या क्षेत्रात येत असल्याने त्यांनी येथील नियम-कायद्यांचे पालन करावे. आम्ही भारतात जाऊ तेव्हा तेथील नियमांची खबरदारी घ्यावी, असे विधान संबंधित विभागाचे उपायुक्त जी किंगमिन यांनी केले आहे.

कैलास मानसरोवरचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भारतीय भाविकांच्या सुविधेची चीन पूर्ण काळजी घेतो. भारत सरकारने स्वतःच्या क्षेत्रात भाविकांच्या सुविधेकरता पायाभूत सुविधा वाढवाव्यात. भारत सरकार स्वतःच्या क्षेत्रातील रस्त्यांचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा आहे. भाविकांना लिपुलेख (उत्तराखंड) येथून येण्यास 4-5 दिवसांचा कालावधी लागत असून यात खूप वेळ आणि ऊर्जा वाया जात असल्याचे किंगमिन म्हणाले.

भाविकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही मार्ग चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी मोठा निधी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्रावण सोमवारी यज्ञ

30 जुलै रोजी दिल्लीहून रवाना झालेल्या तुकडीने प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर मानसरोवराच्या काठावर यज्ञ केला आहे. कैलास पर्वताला भगवान शिव यांचे निवासस्थान मानले जाते. भारतीय विदेश मंत्रालय जून ते सप्टेंबर दरम्यान कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करते. यात हिंदू, बौद्ध आणि जैन भाविक सामील होतात. यात्रेत सहभागी होण्याकरता चीन सरकारकडून व्हिसा प्राप्त करावा लागतो.