|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » लॉर्डस्वर सारा फोकस जोफ्रा आर्चरवरच

लॉर्डस्वर सारा फोकस जोफ्रा आर्चरवरच 

लंडन / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथला स्वस्तात बाद करण्यासाठी यजमान इंग्लंडने आजपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात पाचारण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिष्ठेच्या लॉर्डस्वरील कसोटीत विजय खेचून आणत मालिकेत बरोबरी प्राप्त करणे, हे इंग्लंडसमोरचे मुख्य लक्ष्य असणार आहे. यापूर्वी, एजबस्टन येथील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तब्बल 251 धावांच्या मोठय़ा फरकाने जिंकली होती.

विद्यमान ऍशेस जेते कांगारु 18 वर्षांनंतर प्रथमच इंग्लिश भूमीत ऍशेस जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून या महत्त्वाकांक्षी मोहिमेत अर्थातच त्यांची पूर्ण भिस्त स्टीव्ह स्मिथवर असेल आणि त्या पार्श्वभूमीवर स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडने आर्चर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे.

ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने आजवर केवळ दोनच वेळा ऍशेस जिंकली आहे. 1981 मध्ये सर्वप्रथम अष्टपैलू इयान बोथमने तसा पराक्रम गाजवला तर 2005 मध्ये रोमांचक मालिकेत इंग्लंडने त्याची पुनःप्रचिती आणून दिली. त्यावेळी इंग्लंडने 2-1 अशी निसटती बाजी मारली होती.

यंदा सध्या सुरु असलेल्या मालिकेत एजबस्टनमधील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणारा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन केवळ चार षटके टाकल्यानंतरच जायबंदी झाला आणि दुसऱया कसोटीत तो खेळू शकणार नाही, हे देखील निश्चित झाले. याचमुळे, जोफ्रा आर्चरचे कसोटी पदार्पण येथे जवळपास निश्चित झाले आहे. आर्चरने याच ऐतिहासिक मैदानावर महिनाभरापूर्वी नाटय़मय सुपरओव्हर टाकले होते.

जॅक लीचचे स्थानही निश्चित

इंग्लंडचा संघ या लढतीसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचला देखील संधी देणार, असे मानले जाते. जॅकने मागील महिन्यात आयर्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात लॉर्ड्सवरच 92 धावांची शानदार खेळी साकारली होती. इंग्लंडला यापूर्वी पहिल्या कसोटीत अँडरसनची खूपच उणीव जाणवली. आता आर्चर हा काही अँडरसनप्रमाणे कसलेला नाही. पण, प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याची क्षमता त्याच्याकडे असल्याने इंग्लंडने त्याच्यावर भिस्त ठेवली आहे.

इंग्लंडला स्मिथपेक्षाही आपल्या फलंदाजांची अधिक चिंता

या लढतीत यजमान इंग्लंडसमोर स्टीव्ह स्मिथचे मुख्य आव्हान असेलच. पण, याही शिवाय, त्यांना आपलीच फलंदाजी कशी होईल, याची अधिक चिंता असल्याचे संकेत आहेत. एजबस्टनला इंग्लंडचा संघ बऱयाचदा उत्तम स्थितीत होता. पण, याचा त्यांना अपेक्षित लाभ मात्र घेता आला नाही. पहिल्या डावात 1 बाद 154 धावांवरुन त्यांना मोठी धावसंख्या रचता आली असती. पण, तसे झाल्याचे दिसून आले नाही. 

रोरी बर्न्सने त्यावेळी जरुर शतक झळकावले. पण, जेसॉन रॉय, जो डेन्ली, जोस बटलर व जॉनी बेयरस्टो धावांसाठी चांगलेच झगडताना दिसून आले. कर्णधार जो रुटने दोन डावात अनुक्रमे 57 व 28 धावांचे योगदान दिले. पण, एखाद्या आघाडीच्या फलंदाजासाठी ते अजिबात पुरेसे ठरणारे नव्हते. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात 5 बळी घेतले आाि ख्रिस वोक्सला लॉर्डसवर गोलंदाजी करणे नेहमीच पसंत असते. यात आर्चरचा समावेश झाल्याने स्मिथला रोखण्याच्या दिशेनेच त्यांची रणनीती सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, कॅमेरुन बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन (कर्णधार-यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड.

इंग्लंड : जो रुट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करण, जो डेन्ली, जॅक लीच, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.

भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 3.30 पासून.

बॉक्स

स्टीव्ह स्मिथला रोखणे हेच इंग्लंडसमोर मुख्य आव्हान

पहिल्या कसोटी सामन्यात धुवांधार फलंदाजी करत सामना अक्षरशः हिसकावून नेणाऱया स्टीव्ह स्मिथला स्वस्तात बाद करणे, हे इंग्लंडसमोर या कसोटीतील मुख्य आव्हान असणार आहे. एजबस्टनमध्ये केवळ स्मिथच्या कारनाम्यामुळेच इतिहास घडला होता, याची इंग्लंडला पूर्ण जाणीव आहे. त्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची एकवेळ 8 बाद 122 अशी दाणादाण उडाली होती. पण, स्मिथने त्यांना तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत 284 धावांपर्यंतची स्वप्नवत मजल गाठून दिली होती. त्यानंतर दुसऱया डावात स्मिथने सलग शतक झळकावले आणि मॅथ्यू वेडच्या शतकाचीही त्याला साथ लाभली. या उभयतांनी त्यावेळी इंग्लंडच्या हातातोंडातील विजयाचा घास काढून घेतला. स्मिथने त्या लढतीत अनुक्रमे 144 व 142 धावांची धुवांधार खेळी साकारली होती. पण, स्मिथचा अपवाद वगळता या दोन्ही संघांचे बलाबल समसमानच आहे, हे प्रकर्षाने जाणवते.