|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मंबा

मंबा 

संपूर्ण कुटुंब चाकोरीबद्ध आणि सुरक्षित आयुष्य जगणाऱया कुटुंबात एखादा मुलगा मुलखावेगळा असतो. तो मनस्वी असतो. दिलदार असतो. आणि कुटुंबात मिसफिट असतो.  

असा माझा एक लांबचा भाऊ मंबा. मंबा हे त्याचे खरे नाव नाही. सगळे त्याला त्या नावाने हाक मारायचे.  माझ्याहून चार वर्षांनी मोठा असेल. मंबा बॉडी बिल्डर होता. सावळा रंग, मध्यम उंची, अपरं नाक, त्या वेळच्या फॅशनप्रमाणे वाढवलेले लांबसडक केस आणि उंची हाफ शर्ट्स. सिगारेट ओठांच्या कोपऱयात सरकावून तो बोलायचा तेव्हा सिनेमातल्या अजित वगैरेंसारखा दिसायचा. त्या काळात माझी कोणाशी मारामारी झाली की मी दुसऱया दिवशी शत्रूशी लढायला मंबाला घेऊन जायचो! 

दहावीत असताना मला टायफॉईड झाला होता. फॅमिली डॉक्टरांनी रुग्णालयात तपासण्या करून घ्यायला सांगितले. रुग्णालयाची, इंजेक्शन वगैरेची जाम भीती असल्यामुळे मी ओरडायला सुरुवात केली. तेव्हा मंबाने माझी जबाबदारी घेतली. मला सायकलवर डबल सीट नेले. ओपीडीत डॉक्टरांनी एक इंजेक्शन सुचवले आणि युरीन-ब्लड तपासायला सांगितले. आपल्या मजबूत हातांनी मला टेबलवर झोपवून घट्ट पकडण्याची कामगिरी मंबाने पार पाडली. रक्त काढून झाल्यावर नर्सने कंबरेवर एक इंजेक्शन ठोकले. यानंतर मला धरून बाहेर एका झाडाखाली बसवून मंबा गेला आणि भजी घेऊन आला. मी रस्त्यावर खाल्लेली भज्यांची ती पहिली प्लेट.

थोडय़ा वेळाने माझे रिपोर्ट्स मिळाले. पण मघाचे इंजेक्शन दुखत असल्याने मला सायकलवर बसता येईना. तेव्हा माझ्या अंगातला सदरा काढून सायकलच्या नळीला गुंडाळून त्याने उघडाबंब मला त्यावर बसवले आणि घरी आणले. घरी येताना तो एक गाणे गुणगुणत होता. ‘आहा, रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये…’ हे गाणे आजही ऐकले की तो सायकल प्रवास आठवतो.

त्या दुखण्यात मंबा दिवसभर माझ्या जवळ बसून असायचा. बसल्या बसल्या मूडमध्ये आला की ‘आहा रिमझिम के…’ गायचा. त्या गाण्याचे रहस्य काय होते, तोच जाणे. 

पंधरा वर्षांपूर्वी मंबा अचानक गेला. सिगारेट आणि क्वचित मद्यपानाची सवय असली तरी त्याची प्रकृती ठणठणीत होती. एका रात्री त्याला पित्ताचा त्रास झाल्यासारखे वाटले. तो ह्रदयविकाराचा झटका होता. त्यातच तो गेला. माझे धाकटेपण, ‘आहा रिमझिम के…’ गाण्याचे रहस्य आणि बरेच काही घेऊन गेला.

 

Related posts: