|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जिओ क्रांती

जिओ क्रांती 

रिलायन्स-जिओच्या गिगा फायबर इंटरनेट सेवेची घोषणा रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत केल्याने आता खऱया अर्थाने ही बहुप्रतीक्षित सेवा प्रत्यक्षात येणार आहे. अतिमहत्त्वाकांक्षी, अभिनव व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडविणाऱया या सुपरफास्ट इंटरनेटमुळे देशातील ब्रॉड बँड उद्योगाची समीकरणे बदलण्यास मदत होणार आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्र आणि रिलायन्स हे एक समीकरण मानले जाते. देशात या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविण्यात या कंपनीचा महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. एकेकाळी मोबाईल ही श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांची मक्तेदारी मानली जायची. मात्र, रिलायन्सच्या अवघ्या 500 रुपयांतील मोबाईलने या क्षेत्रातील संदर्भ बदलले. मोबाईल ही अशक्यप्राय बाब नाही, आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकतो, हा नवा विश्वास या योजनेने सर्वसामान्यांना दिला. त्यानंतर बाजारात अनेक कंपन्या, त्यांचे मोबाईल येत राहिले. मधल्या काळात काहीशा गलितगात्र झालेल्या रिलायन्सला तीन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या जिओ 4 जी सुविधेमुळे पुन्हा एकदा जीवदान मिळाल्याचे दिसत आहे. जिओची ग्राहकसंख्या दरमहा वाढतच असून, मेमध्ये जिओने तब्बल 81.8 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. यामुळे त्यांची एकूण ग्राहकसंख्या 32.29 कोटींवर पोहोचल्याची आकडेवारी सांगते. 32.03 कोटी ग्राहकसंख्या असणारी एअरटेलसारखी कंपनी यामुळे दुसऱया क्रमांकावर घसरली आहे. जिओचे आव्हान परतवून लावण्यासाठी एकत्र आलेली व्होडाफोन-आयडिया कंपनी या सूचीत प्रथम स्थानी कायम आहे. व्होडाफोन आयडियाचे देशभरात 38.75 कोटी ग्राहक आहेत. किंबहुना, या दोन कंपन्यांमध्ये आता मोठे अंतर राहिले नसल्याचे दिसून येते. जिओमुळे व्होडाफोन आयडिया व एअरटेलने मेमध्ये अनुक्रमे 57 लाख व 15 लाख ग्राहक गमावले आहेत. पुढच्या काळात 50 कोटींचा टप्पा गाठण्याचे मुकेश अंबानी यांचे ध्येय आहे. यावरून जिओच्या विद्युत वेगाची कल्पना करता येईल. इतर कंपन्यांचे नेटवर्क, नेट स्पीडचा विचार करता या सर्वांमध्ये जिओ सरस ठरते. हेच त्यांच्या या झपाटय़ाचे कारण असावे. गिगा फायबरच्या माध्यमातून कंपनीने आता सर्वांसमोरच मोठे आव्हान उभे केले असून, इंटरनेट ऑफ थिंग्ज, घराघरात ब्रॉडबँड, उद्योगासाठी ब्रॉडबँन्ड, लघुउद्योजकांसाठी ब्रॉडबँन्ड सेवा अशा चार सेवांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून या सेवेची सुरुवात होणार असून, यातून ग्राहकांना लाइफ टाइम मोफत कॉलिंगची सुविधा असणारा लँडलाईन फोन मिळणार आहे. मुख्य म्हणजे त्याच कनेक्शनवर ब्रॉडबँडची सुविधा तसेच सेट टॉप बॉक्सद्वारे टीव्हीदेखील पाहता येणार आहे. अर्थात याकरिता 700 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत कमर्शिअल प्लान्स उपलब्ध असतील. याद्वारे ग्राहक घरबसल्या टीव्हीवर चित्रपट पाहू शकतील. या अंतर्गत अगदी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चाही आस्वाद घ्यायला मिळणार असेल, तर ही सुविधा विलक्षणच म्हणायला हवी. थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची मौज वेगळीच असली, तरी याचे निश्चित चित्रपटगृहांच्या व्यवसायावर परिणाम संभवतात. जून 2020 पर्यंत लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यात येणार आहेत. प्रारंभी 1600 शहरांतील 2 कोटी घरगुती ग्राहकांपर्यंत आणि 1.5 कोटी व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे लक्ष्य असेल. स्वाभाविकच पुढच्या टप्प्यांमध्ये अधिकाधिक विस्तार होत राहणार, हे निश्चित आहे. आजचे जग हे धावते आहे. जीवघेण्या स्पर्धेत प्रत्येकाला पुढे जायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडील साधनेही तितकीच सक्षम हवीत व काळासोबत चालणारी असावीत. हा प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. ही अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने या माध्यमातून पावले पडली आहेत. कमीत कमी 100 एमबीपीएस ते 1000 एमबीपीएस गतीने इंटरनेट सुविधा हे त्याचेच द्योतक म्हणायचे. जिओ सेट टॉप बॉक्सवर स्थानिक ऑपरेटर्सद्वारे दिल्या जाणाऱया सेवाही मिळतील. एचडी चॅनेल्स, व्हीडिओ कॉलिंग, व्हॉईस सर्चपासून  व्हीडिओ गेमही खेळता येईल. त्याचे ग्राफिकही जगात सर्वोत्तम राहणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. जिओ फायबरचा वार्षिक प्लॅन घेणाऱयाला एचडी किंवा फोर के एलइडी टीव्ही आणि फोर के सेट टॉप बॉक्सही मोफत मिळेल, ही ऑफरही आकर्षक ठरते. देशांतर्गत सेवा आवाक्यात आली असली, तरी अद्याप आंतरराष्ट्रीय कॉल महागडे पडतात. जिओने वाजवी दरात म्हणजे जवळपास दहा पट कमी किमतीत आयएसडी कॉलिंग पॅकेज देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि कॅनडा येथे करण्यात येणाऱया इंटरनॅशनल कॉल्ससाठी 500 रु. प्रतिमहिना योजनेचीही कंपनीने घोषणा केली आहे. जग जवळ येत असल्याचेच हे प्रतीक ठरते. शिक्षण, व्यवसाय वा नोकरीच्या निमित्ताने अनेक भारतीय जगभरातील विविध देशांत स्थायिक आहेत. यातून त्यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढू शकेल. अर्थात कुठलीही कंपनी ही आपल्या फायद्याकरिता प्रामुख्याने योजना राबवित असते. आजमितीला कंपन्यांमध्ये स्पर्धा प्रचंड आहे. त्यातून ग्राहकाला लाभ मिळत असेल, तर चांगलेच आहे. अर्थात योजना खिसेकापू असल्यास त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही ग्राहकाकडे राहीलच. केंद्र सरकारने अलीकडेच जम्मू काश्मिरसाठीचे 370 कलम रद्द केले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. भविष्यात कंपनीकडून गुंतवणूक झाली, तर नक्कीच नंदनवनाच्या विकासाला चालना मिळू शकते. दुसरीकडे सौदी अरेबियाची ऍरॅमको आणि ब्रिटनची बीपी पीएलसी यांना 1.15 लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी विकून रिलायन्स इंडस्ट्रीजला 18 महिन्यांत ‘शून्य शुद्ध कर्ज संस्था’ करण्याचा संकल्पही अंबानी यांनी केला आहे. 30 जूनपर्यंतचे कंपनीचे कर्ज 2 लाख 88 हजार 243 कोटीचे आहे. 2021 पर्यंत कर्जमुक्ती साध्य झाल्यास अंबानी यांची श्रीमंती खऱया अर्थाने ‘धन धना धन’ होईल.

Related posts: