|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खबरदारीच्या उपाय योजना सर्वत्र राबविण्याची मागणी

खबरदारीच्या उपाय योजना सर्वत्र राबविण्याची मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तसेच गटारी व नाल्यामध्ये टाकण्यात आलेला कचरा रस्त्यावरून वाहण्याचे चित्र निदर्शनास आले होते. पूर परिस्थिती नियंत्रणात आल्याने रोगराई पसरूनये याकरिता मनपा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र शहरातील काही ठराविक भागातच रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे नाले, गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या परिणामी नाले आणि गटारीमध्ये टाकण्यात आलेला कचरा रस्त्यावर पसरला आहे. अशातच जोरदार पावसामुळे शहरातील स्वच्छतेचे काम ठप्प झाले होते. काही भागातील कचऱयाची उचल देखील झाली नसल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे रोगराई फैलावण्याचा धोका वाढला आहे. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. सध्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प असल्याने मिळेल त्या पाण्यावर नागरिकांना तहाण भागवावी लागत आहे. यामुळे विहिरीमध्ये ब्लीचिंग पावडर टाकण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रोगराईची लागन होण्याची संभावता असल्याने शिळे अन्न व उघडय़ावरील खाद्य पदार्थ खाऊ नये, तसेच साठवून ठेवण्यात आलेले पाणी पिऊ नये, असे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे. खड्डय़ात किंवा घराशेजारी पाणी साचू देवूनये याबाबतची जनजागृती पत्रकाद्वारे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोगराई प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे. मात्र ही मोहिम काही ठराविक भागात राबविण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

शहरातील समर्थ नगर, टिळकवाडी, मराठा कॉलनी, नानावाडी, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, साई कॉलनी, हुलबत्ते कॉलनी, गुडशेडरोड, नेकार कॉलनी, वडगाव बाळकृष्ण नगर, कसाई गल्ली, कामत गल्ली, शिवाजी नगर, इंद्रप्रस्थ नगर आदींसह विविध भागात पाणी साचुन होते. या भागात रोगराई पसरण्याचा धोका अधिक आहे. यामुळे या भागात रोगराई प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असून, शहरातील अन्य भागात देखील औषध फवारणी करण्यात यावी अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related posts: