|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शासनाने पूरग्रस्त शेतकऱयांची 100 टक्के कर्जमाफी करावी

शासनाने पूरग्रस्त शेतकऱयांची 100 टक्के कर्जमाफी करावी 

प्रतिनिधी/ कागल

सांगली आणि कोल्हापूर वर पुरामुळे  मोठे संकट आले आहे. शिरोळची वाईट अवस्था झाली आहे. अनेकांचा  घर-संसार जनावरे यांना मुकावे लागले आहे. अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, संघटना पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. संपूर्ण समाज पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे. लाखो हेक्टर क्षेत्रातील ऊस, भात, भुईमूग ,सोयाबीन आदी पिके पाण्यात गेली आहेत. त्यामुळे अगणित नुकसान झाले आहे. यासाठी  शासनाने सर्व पूरग्रस्त शेतकऱयांची 100 टक्के कर्जमाफी करावी, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

येथील नगरपालिकेच्या शाहू वाचन मंदिरांमध्ये पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी आयोजित केलेल्या सर्व पक्षीय  बैठकीमध्ये आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा  माणिक माळी होत्या.याप्रसंगी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, भाजपाचे सुरेश पाटील,  शिवसेनेचे मंडलिक कारखान्याचे संचालक ईगल प्रभावळकर, संजय कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, आरोग्य सभापती प्रविण काळबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ मुश्रीफ पुढे म्हणाले,  कागल तालुक्यामध्ये दोन हजार कुटुंबे पुरामध्ये अडकलेली आहेत. त्यांचे स्थलांतर गावच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी, सार्वजनिक संस्था, सहकारी संस्था तरूण मंडळी  यांनी केली असून गेले आठवडाभर ते त्यांचा सांभाळ करीत आहेत. मात्र शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी त्या त्यापर्यंत मिळालेली नाही. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा देऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले पाहिजे.  मदतीतून एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्याचा मानस असून या निधीतून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या पूरग्रस्तांना वेळेत आणि योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. शासनाने वेळेत दक्षता घ्यायला हवी होती. यावेळी त्यांनी  आपले दीड लाख रूपये इतके वेतन पूरग्रस्तांसाठी जाहीर केली.

भैय्या माने म्हणाले, नैसर्गिक संकट काळात मदतीसाठी कागल कायमच आघाडीवर राहिले आहे. पुरामुळे शेतकरी बँका, कारखाने, सर्वसामान्य लोक अडचणीत आले आहेत. या सर्वांना मदत मिळणे आवश्यक आहे.त्यांनी माने कुटुंबियांच्या वतीने 51 हजार निधी देण्याची घोषणा केली.

प्रकाश गडेकर म्हणाले, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठय़ा प्रमाणात मदत मिळणे आवश्यक आहे. उद्याच्या गणेश उत्सवामध्ये मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन त्यांनी करून पूरग्रस्तांना एक लाख रुपये मदतीची घोषणा केली.

रमेश माळी यांनी, शिवराज नागरी पतसंस्थेच्या वतीने 25000, नगराध्यक्ष माणिक माळी यांच्यावतीने 25000 आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने एक लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.

यावेळी अनेक उपस्थितांनी  दोन हजारा पासून एक लाखा पर्यंत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली.  याप्रसंगी चंद्रकांत गवळी, दत्ता सावंत सागर कोंडेकर, ईगल प्रभावळकर, शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत आरोग्य सभापती प्रवीण काळबर यांनी  तर आभार नगरसेवक विवेक लोटे यांनी मानले.

बैठकीस पक्ष प्रतोद नितीन दिंडे, राजेंद्र माने, सौरभ पाटील, संजय चितारी , यशवंत गुरव. चंद्रकांत हळभावी, बच्चन कांबळे, महेश मगर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: