|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात ओला दुष्काळ जाहीर करा

कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात ओला दुष्काळ जाहीर करा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्हय़ांत ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरग्रस्त भागासाठी 5 सप्टेंबरपर्यत विशेष पेकेज द्यावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. यावेळी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.

निवेदनात कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात ऑगस्टच्या पंधरवडय़ात अतिवृष्टी झाली, नद्यांना महापूर आला. यामध्ये शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी 10 वर्षे मागे गेला आहे. शासनाच्या तोकडय़ा अनुदानातून तो उभा राहू शकत नाही. याशिवाय अन्य छोटय़ा, मोठय़ा उद्योजकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात ओला दुष्काळ जाहीर करावा, उद्योजकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अनुदान द्यावे, पूरग्रस्तांमधील काहींची घरे पडली आहेत. ते सध्या निवारा केंद्रात ते रहात आहेत, त्यांच्यासाठी तात्पुरती शेड उभारावीत आदी मागण्या केल्या आहेत.

शेतमजूरांना काम नसल्याने त्यांना पुरेसे अन्न, अनुदान द्यावे, पूरबाधित गावांतील 70 टक्के लोकांना अनुदान मिळाले आहे. उर्वरीत 30 टक्के लोकांनाही ते मिळावे, इचलकरंजीला पूरस्थितीत लागणारी यंत्रसामग्री मिळावी, मत्स्य व्यावसायिकांना अनुदान मिळावे, पूरबाधित भागातील घरकुलात यादी नसलेल्यांचे अर्ज घेतले आहेत, त्यांना मंजुरी मिळावी, 100 टक्के पूरबाधित असलेल्या गावांचे शासकीय जमिनीत पुनर्वसन करावे आदी मागण्या 5 सप्टेंबरपर्यत पूर्ण कराव्यात, अन्यथा पुरग्रस्तांसमवेत मोर्चाचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आमदार उल्हास पाटील यांच्याही स्वाक्षऱया असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

Related posts: