|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोकाक तालुक्यातील तिघांना जन्मठेप

गोकाक तालुक्यातील तिघांना जन्मठेप 

वार्ताहर/  घटप्रभा:

चिकनंदी (ता. गोकाक) येथे जमिनीच्या जागेवरून झालेल्या वादात तिघांचा खून झाला होता. याप्रकरणातील तिघांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा 12 व्या अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार एम. व आनंद शेट्टी यांनी सुनावली. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली होती. मात्र यापूर्वी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ईश्वर मल्लाप्पा वग्गर, मल्लिकार्जुन वग्गर व श्रीकांत वग्गर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी नात्याने पिता-पुत्र आहेत. राम वग्गर (वय 60), पद्मावती वग्गर (वय 55) व निरुपाद (वय 20) अशी खून झालेल्यांची तर भागव्वा ईश्वर वग्गर व उदप्पा सिद्धन्नवर (रा. हिरेनंदी) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, 9 जुलै 2014 रोजी वग्गर कुटुंबीयांमध्ये जमीन वाटणीबाबत बोलणी सुरू होते. त्यावेळी या दोन कुटुंबांमध्ये मोठा वादविवाद झाला होता. यातून ईश्वर वग्गर, श्रीकांत वग्गर, मल्लिकार्जुन वग्गर, ईश्वर वग्गर व उदप्पा सिद्धन्नवर यांनी राम वग्गर, पद्मावती वग्गर व निरुपाद वग्गर यांचा कुऱहाडीने वार करून खून केला होता. त्यानंतर तत्कालीन सीपीआय बी. एस. लोकापूर यांनी पाच जणांविरोधात गोकाक ग्रामीण पोलिसात दोषारोप दाखल केले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने काही दिवसांपूर्वी भागव्वा वग्गर व उदप्पा सिद्धन्नवर यांची निर्दोष मुक्तता केली होती. तर ईश्वर वग्गर, श्रीकांत वग्गर, मल्लिकार्जुन वग्गर यांच्यावरील सुनावणी पुढे सुरूच ठेवली होती. दरम्यान न्यायालयाधी विजयकुमार एम., आनंद शेट्टी यांनी सर्व साक्षी, पुरावे तपासून ईश्वर, श्रीकांत व मल्लिकार्जुनला दोषी ठरविले असून त्यांना जन्मठेपेसह प्रत्येकी 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. सरकारी वकील म्हणून राजमहेंद्र किरणगी यांनी काम पाहिले. 

 

Related posts: