|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भ्रष्टाचाराविरुद्ध अभियान, पण बेरोजगारीचे काय?

भ्रष्टाचाराविरुद्ध अभियान, पण बेरोजगारीचे काय? 

चिदंबरम यांच्या अटकेद्वारे भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी सरकारने मोहीमच छेडली आहे असा सूर सत्ताधारी लावत असले तरी एक प्रकारे या अटकनाटय़ाने मरगळलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचे काम मात्र त्यांनी केले आहे. चिदंबरम यांच्यानंतर आता एकेक काँग्रेस नेत्याचा नंबर लागणार याची जाणीव सोनिया आणि राहुल गांधींना झालेली आहे.

 

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम याना सरतेशेवटी पोलीस कोठडीत पाठवून भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पहिले दमदार पाऊल उचलले की आपल्या एका तालेवार विरोधकाला उगीचच अद्दल घडवून साऱया विरोधी पक्षांनाच सावध केले हे काळच दाखवेल. चिदंबरम म्हणजे कोणी संत नव्हेत ना कोणी लोकनेता. पण ज्याप्रकारे त्यांची रवानगी तुरुंगात केली गेली त्याने निश्चितच त्यांना नेता बनवले आहे. चिदंबरम आणि मोदी-शाह यांचे विळय़ाभोपळय़ाचे सख्य. सोहराबुद्दीन प्रकरणात गुजरातच्या या दोन्ही नेत्यांना चिदंबरमनी सळो की पळो करून सोडले होते तेव्हा ते केंद्रात गृहमंत्री होते. गेली  पांच वर्षे चिदंबरम पोटातील पाणी हालू न देता विनासायास राहिले याला कारण त्यांचे वकील मित्र आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे होत. चिदंबरम-जेटली यांचे सख्य एवढे की नितीन गडकरीना भाजपाध्यक्ष म्हणून दुसरी टर्म मिळू नये म्हणून त्याकाळी अर्थमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी अचानक ‘पूरती’ समूहावर आयकर खात्याची धाड घातली होती हे जगजाहीर आहे. आता जेटली यांच्या अकाली मृत्यूने भाजपमधील एक सुज्ञ नेता हरपला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर जेटलीचे जाणे म्हणजे भाजपावरील मोदी-शाह यांची पकड वाढणार आहे आणि त्यांचे ‘हम करेसो कायदा’ तंत्र बोकाळणार आहे. चिदंबरम हे किती सत्यवान वा किती भ्रष्ट हे येत्या काळात सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होणार काय या विषयी मात्र शंका आहे. आयएनएक्स मीडिया केस हीच भुसभुशीत पायावर आधारलेली आहे. इंद्राणी मुखर्जी या बाईच्या दाव्यावर ती बेतली आहे असे सकृतदर्शनी तरी दिसत आहे. ही इंद्राणी कोण म्हणून विचाराल तर अचंबाच वाटेल. आपल्या मुलीच्या शिवानी बोराच्या हत्येच्या आरोपाखाली ती शिक्षा भोगत आहे. आयएनएक्स केसमध्ये ती माफीचा साक्षीदार बनली आहे. सोली सोराबजी यांच्यासारखे मोठे निष्णात वकील इंद्राणीवर भरवसा करणे फार चूक आहे असे सांगत आहेत तर एन के सिंग यांच्यासारखे नावाजलेले पोलीस अधिकारी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनचा जबर दुरूपयोग होत आहे अशी व्यथा व्यक्त करत आहेत. रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख सुब्बा राव यांनी तर चिदंबरम या प्रकरणात अजिबात दोषी नाहीत असा निर्वाळा दिला आहे. परकीय गुंतवणुकीला परवानगी अधिकारी देत असतात, मंत्री नव्हे असा त्यांचा दावा आहे.

महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याविरुद्ध इडीची कारवाई सुरू झाली आहे आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अजित पवारांविरुद्ध केस टाकली जात आहे हे ही लक्षणीय होय. याचा अर्थ ते निर्दोष आहेत असा नव्हे. पण पाच वर्षे सरकारात असताना या चौकशा झाल्या असत्या तर सोक्षमोक्ष तरी लागला असता. चिदंबरम यांच्या अटकेद्वारे भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी सरकारने मोहीमच छेडली आहे असा सूर सत्ताधारी लावत असले तरी एक प्रकारे या अटकनाटय़ाने मरगळलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचे काम मात्र त्यांनी केले आहे. चिदंबरम यांच्यानंतर आता एकेक काँग्रेस नेत्याचा नंबर लागणार याची जाणीव सोनिया आणि राहुल गांधींना झालेली आहे. त्यामुळे सारा पक्षच चिदंबरम यांच्या मागे उभा राहिला. आता नॅशनल हेराल्ड प्रकरणाला हात घातला जाऊ शकतो. राहुल, सोनिया आणि मोतीलाल व्होरा यांचेसह बरेच काँग्रेस नेते त्यात आरोपी आहेत. या अटकनाटय़ाने भाजपअंतर्गत देखील एक प्रकारे खळबळ माजवली आहे. देशापुढील सध्या समस्या काय आहेत आणि आपण हे काय करून राहिलो आहोत याविषयी सत्ताधारी वर्तुळात दबून चर्चा सुरू झाली आहे. काल परवापर्यंत सरकारच्या आर्थिक नीतीची भलावण करणारे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी वित्तीय क्षेत्रात अतिशय भयावह स्थिती आहे याची केवळ सपशेल कबुलीच दिलेली आहे असे नव्हे तर त्यावर मात करण्याकरता न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची पावले उचलणे भाग आहे. वित्तीय क्षेत्रात कोणाचाच कोणावर विश्वास नाही आणि त्यामुळे कोणी नवी गुंतवणूक करायला तयार नाही. पार्लेमधील 10,000 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात आले कारण पाच रुपये किमतीच्या पार्ले जी बिस्किटाला देखील मार्केट मध्ये उठाव नाही. सर्वच क्षेत्रात कामगारांची छाटणी सुरू झाल्याने आर्थिक हालत दिवसेंदिवस खराब होत जाणार आहे. किंगफिशर विमान कंपनीचे बारा वाजले. जेट एयरवेज नुकतीच बंद पडली आणि आता त्यापाठोपाठ एअर इंडियादेखील राम म्हणणार काय अशी शंका येऊ लागली आहे. देशातील सहा विमानतळावर एअर इंडियाच्या विमानांना इंधन देणे बंद झाले आहे. जर ‘महाराजा’ च्या डोक्मयावरील कर्जाचे ओझे उतरवण्यास सरकारने सत्वर मदत केली नाही तर आमची विमाने कायमची बसतील, असा इशारा कंपनी अधिकाऱयांनी दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे भाजपचे नेते देखील एअर इंडियाची आर्थिक  गळचेपी का बरे सुरु आहे असे प्रश्न विचारू लागले आहेत. कोणाला भंगारच्या भावात एअर इंडिया विकण्याचा डाव तर सुरु नाही ना अशी शंका स्वामींना येत आहे. ते याबाबत लवकरच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. राष्ट्रीयीकृत तेल कंपन्यांची एअर इंडियाने 4500 कोटीची थकबाकी आहे. मोदी राज्यात  ‘महाराजा’ ला घरघर लागली आहे अशीच ही चिन्हे आहेत. 

‘मोदी है तो मंदी हैं’,  असे टोमणे विरोधक मारत आहेत.  अर्थव्यस्थेची अशी दयनीय  अवस्था होत असताना सरकारचे मुख्य अर्थतज्ञ कृष्णा मूर्ती  सुब्रमणियम यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला अजब कानपिचक्मया दिलेल्या आहेत. उद्योगधंद्यात चढउतार होत असतात. त्याचे परिणाम उद्योगधंद्यांनीच भोगायचे असतात. तेथे सरकारचा काय संबंध, असा त्यांनी विश्वामित्री पवित्र घेतला आहे.सरतेशेवटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक पॅकेज जाहीर करून सरकारला थोडीशी जाग आल्याचे दाखवले आहे. पण त्यांच्या या घोषणेने फारशी काही सुधारणा होणार नाही. कारण हा ‘उंट के मुह में जीरा’ घालण्याचा प्रकार आहे असे जाणकार सांगत आहेत.  

पंतप्रधान आपल्या विदेश दौऱयात गर्क आहेत. भारताने किती झपाटय़ाने दारिद्रय़ निर्मूलनाचे काम केले आहे असे दावे ते करत आहेत. देशात सारे काही आलबेल आहे आणि देशात दुधातुपाच्या नद्या वाहत आहेत असाच त्यांच्या सांगण्याचा भावार्थ आहे. नव भारताचे (न्यू इंडिया) चे निर्माण सुरू झाले आहे.

Related posts: