|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » गगनयान : अंतराळवीर निवडीचा पहिला टप्पा पूर्ण

गगनयान : अंतराळवीर निवडीचा पहिला टप्पा पूर्ण 

पुढील महिन्यात पूर्ण होणार प्रक्रिया : रशियात वैमानिकांना मिळणार प्रशिक्षण, 2021 मध्ये मोहीम राबविणार

वृत्तसंस्था/  बेंगळूर

 अंतराळातील भारताची पहिली मानवयुक्त मोहीम ‘गगनयान’साठी वैमानिकांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा भारतीय वायुदलाने शुक्रवारी केली आहे. इन्स्टीटय़ूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीनमध्ये भारतीय अंतराळवीरांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. निवड झालेल्या वैमानिकांची शारीरिक चाचणी, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स, रेडियोलॉजिकल टेस्ट्स, क्लीनिकल टेस्ट्स आणि मानसशास्त्राrय स्तरावर मूल्यांकन करण्यात आल्याची माहिती वायुदलाने ट्विटद्वारे दिली आहे.

 तत्पूर्वी 10 वैमानिकांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. 30 वैमानिकांच्या तुकडीपैकी 3-3 वैमानिकांचा एक गट तयार केला जाईल. अखेरीस वैद्यकीय चाचणी आणि अन्य चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करणाऱया तीन वैमानिकांची निवड मोहिमेसाठी केली जाणार आहे.

अंतराळात 7 दिवस वास्तव्य

यंदा मे महिन्यात वायुदलाने इस्रोसोबत गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीर निवड आणि प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी करार केला होता. यांतर्गत 2021 मध्ये गगनयानच्या माध्यमातून तीन सदस्यीय वैज्ञानिकांचे एक पथक अंतराळात पाठविले जाणार आहे. हे पथक किमान 7 दिवस अंतराळात वास्तव्य करणार आहे. गगनयान जीएसएलव्ही मॅक-3 च्या माध्यमातून अंतराळात पाठविले जाणार आहे.

रशियासोबत करार

अंतिम 3 अंतराळवीरांची निवड वायुदल आणि इस्रो एकत्रितपणे करत आहेत. या निवड झालेल्या वैमानिकांना प्रशिक्षणासाठी रशियात पाठविले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी इस्रोने रशियाची अंतराळ संशोधन संस्था ग्लावकॉस्मोसशी 2 जुलै रोजी करार केला होता. गगनयान मोहिमेसाठी नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. यात अंतराळवीरांना 15 महिन्यांच्या दीर्घावधीपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

10 हजार कोटींचा खर्च

गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील संबोधनात केली होती. या अंतराळ मोहिमेवर सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये ही मोहीम साकारण्यात येणार आहे. या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील वर्षीच मंजुरी दिली होती.

भारताला सहाय्य

अंतराळाकरता मानवी मोहीम राबविण्याचा अनुभव भारताकडे सद्यस्थितीत नसल्याने अन्य विकसित देशांची मदत घेतली जात आहे. भारताच्या या मोहिमेत रशिया आणि फ्रान्स हे देश थेट मदत करत आहेत. तर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाकडूनही मदत मिळण्याची शक्यता आहे.

 

Related posts: