|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गृहित धरू नका, प्रसंगी विधानसभाही लढवू

गृहित धरू नका, प्रसंगी विधानसभाही लढवू 

प्रतिनिधी/ कराड

संघर्ष पाचवीला पूजलेला असून लढणे आमच्या रक्तात आहे. कराड दक्षिणमध्ये यापुढच्या वाटचालीत आम्हाला कोणीही गृहित धरू नये. कोणाचेही बारा वाजवण्याची ताकद आमच्यात आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभेला लढण्याचा आग्रह केला आहे. खासदार उदयनराजे भोसलेंसह सर्वांशी विचारविनिमय करून निर्णय लवकरच जाहीर करू. प्रसंगी विधानसभाही लढवू, असा इशारा जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला.

  कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव यांच्यावर यापूर्वी झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत बहुतांश समर्थकांनी यादव यांनी आता किंगमेकर होण्यापेक्षा किंग व्हावे. दक्षिणची विधानसभा लढवावी, अशी जोरदार मागणी केली.

बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, माजी उपनगराध्यक्ष बंडाकाका डुबल, माजी नगराध्यक्षा संगीता देसाई यांच्यासह पालिकेतील सुमारे 13 नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  प्रारंभी सचिन पाटील, आर. के. पवार, शरद केळकर, रवींद्र थोरात, तानाजी पुंभार, प्रकाश वायदंडे, अख्तर आंबेकरी, रमेश मोरे, इरफान सय्यद, नगरसेवक अतुल शिंदे, संगीता देसाई यांनी, यादव यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. ते जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे वाटचाल करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या ताकदीचा वापर करून दुर्लक्ष केले जाते. कार्यकर्त्यांची घुसमट होण्यापेक्षा, त्यांच्या अपेक्षांचा विचार करावा, शहरवासियांच्या सुखदु:खात सहभागी होणाराच उमेदवार निवडणुकीत असावा, अशा भावना व्यक्त केल्या.

  हणमंत पवार म्हणाले की, आतापर्यंत इतर नेत्यांच्या पाटय़ा टाकण्याचे काम केले आहे. यापुढील काळात या गटाचा वापर होऊ देणार नाही. संबंधितांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही. विजय वाटेगावकर म्हणाले की, आजचा मेळावा हा कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यासाठी नसून कार्यकर्त्यांचे मत आजमावण्यासाठी आहे. बलशाली भारतासाठी युवकांची गरज असल्याचे सांगितले जाते तर मग दक्षिणमध्ये यादव यांच्यासारखा उमदा नेता का नको. कार्यकर्त्यांनीच त्यांची उमेदवारी जाहीर करावी. स्मिता हुलवान यांनी, आपण यापुढील काळात यादव यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार असल्याचे सांगितले.

राजेंदसिंह यादव म्हणाले की, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रमाणे काम केले. आयुष्यात पैसा कमावला नाही, लोक हीच आमची संपत्ती आहे. मात्र राजकारणात आमचे मीठ अळणी आहे. ज्यांना मदत केली, त्यांनी काय केले, हे लोकांसमोर आहे. निवडणुकीला मदत घ्यायची आणि नंतर आमचा शेंडा खुडायचे काम केले जाते. पालिका निवडणुकीनंतर निरोप येण्याची दोन वर्षे वाट पाहात होतो. मात्र नेतृत्वाचे कान हलके असले की काय होते, हे पाहावयास मिळाले. आम्ही जेथे असतो, तेथे प्रामाणिकपणे काम करतो. तरीही हे घडले, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. ज्यांना सहकार्याची गरज वाटते, त्यांनी मागे काय केले याचा विचार करावा. आज ट्रेलर झाला असून पिक्चर अजून बाकी आहे. लवकरच निर्णय जाहीर करू. 

कुणाचेही बारा वाजवण्याची क्षमता

ज्या ठिकाणी आमच्या संघटनेचा मानसन्मान ठेवला जाईल, शहर विकासाचे ध्येय ठेवले जाईल, लोकांचे प्रश्न सुटतील तिथेच आम्ही राहणार आहोत. कुणाचेही बारा वाजवण्याची आमची क्षमता आहे. यापुढील वाटचालीत कोणीही आम्हाला गृहित धरू नये. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह समर्थकांशी विचारविनिमय करून लवकरच निर्णय जाहीर करू. प्रसंगी दक्षिण विधानसभाही लढवू. आम्हाला कोणी अस्पृश्य नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Related posts: