|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामसेवक, महसूलनंतर आता शिक्षक संपावर

ग्रामसेवक, महसूलनंतर आता शिक्षक संपावर 

सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा उद्यापासून संप : जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये ग्रामसेवक व महसूल कर्मचारी संपावर गेलेले असतानाच आता शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी समन्वय समितीमार्फत आज सोमवारी 9 सप्टेंबर एक दिवसाचा लाक्षणिक संप करत बेमुदत संपाचे निवेदन जिल्हाधिकाऱयामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.

ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यासाठी ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱयांकडे जमा करत संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. त्यामुळे आता ग्रामसेवकांचे काम शिक्षकांनी करावे, अशा नोटिसा काढणे सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर महसूल कर्मचाऱयांनीही 5 सप्टेंबरपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे महसुली कामकाज ठप्प झालेले आहे. त्यानंतर आता शिक्षक व इतर कर्मचाऱयांनीही संपाचा इशारा दिला आहे.

कर्मचाऱयांच्या अनेक न्याय मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले आहेत. नवीन कर्मचाऱयांना लागू असलेली अंशदायी पेन्शन योजना ही कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करणारी असल्याने ही बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी गेली 14 वर्षे राज्यातील कर्मचारी प्राणपणाने मांडत आहेत. या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या. मात्र, शासन या मागण्यांकडे दुर्लक्षच करत आहे. शासनाच्या या उदासिनतेविरुद्ध सर्व कर्मचाऱयांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे 5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत कर्मचाऱयांनी काळय़ा फिती लावून निषेध केला आहे. 9 सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला.

या आंदोलनानंतर आता 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने जिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आले आहे. या बेमुदत संपामध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती अशा विविध शिक्षक संघटना संपामध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.

एका ग्रामसेवकाजवळ 20 ग्रा. पं. चा कार्यभार

ग्रामसेवकांनी संप पुकारत ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱयांच्या ताब्यात दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे काम बंद राहू नये, यासाठी जे कंत्राटी ग्रामसेवक आहेत, त्यांच्याजवळ अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. परंतु एका-एका कंत्राटी ग्रामसेवकाजवळ 15 ते 20 ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवक एवढय़ा ग्रामपंचायतीचे काम एकाचवेळी कसे करणार? असा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीचे काम ठप्प झाले आहे.

Related posts: