|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिवसेनेची जिल्हय़ातील आठही जागांसाठी स्वबळाची तयारी

शिवसेनेची जिल्हय़ातील आठही जागांसाठी स्वबळाची तयारी 

प्रतिनिधी/ सांगली

एका बाजूला भाजपाने मेगा भरती करत राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रसंगी स्वबळाची तयारी सुरु केली असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असणाऱया शिवसेनेनेही स्वबळाच्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने सांगली जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांना तातडीने मुंबईला बोलावले आहे. या इच्छुकांच्या मुलाखती आणि बैठक असे स्वरुप असलेल्या सेनेच्या  मंगळवारी 10 रोजी मुंबईमध्ये होणाऱया या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिले आहे.

गणेशोत्सव संपताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एका बाजूला राज्यातील सत्ताधारी भाजपाने मेगा भरतीचा धडाका लावला असून काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आजी माजी आमदार, माजी मंत्री, नगरसेवक, महापौर यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेतही प्रवेश करणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून युतीमध्ये जागा वाटपावरुन अद्याप कोणताही अंतीम निर्णय झालेला नाही. 288 पैकी निम्म्या निम्म्या व आपल्या वाटेतील काही जागा मित्रपक्षांना सोडण्याचा भाजपाने ठरवले आहे. पण शिवसेनेला जास्त जागा सोडण्यास भाजपा अजूनही अंतीम निर्णयापर्यंत आलेला नाही. त्यामुळे गेल्या वेळी प्रमाणेच शेवटच्या क्षणी शिवसेना आणि भाजपा यांची युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपा प्रमाणेच आपलीही स्वबळाची तयारी असावी या दृष्टीने शिवसेनेने चाचपणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी शिवसेना भवनवर तातडीने बोलविण्यात आले आहे.

सांगली जिल्हय़ामध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील अनिल बाबर हे एकमेव आमदार आहेत. विशेषत: वाळवा-इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. यातील वाळवा-इस्लामपूर हा मतदारसंघ तर भाजपाला सुटलाच आहे अशा दृष्टीने भाजपाच्या इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. पण इकडे शिवसेनेनेही त्यांच्या वाटयाकडील एकही जागा भाजपाला न सोडण्याचे ठरवले आहे. जिल्हय़ात हा पेच कायम असताना सेना नेत्यांनी बैठक बोलाविल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैठकीसाठी जिल्हयातील शिवसेनेचे आठही मतदारसंघातील इच्छुक तसेच जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, अजिंक्य पाटील, शेखर माने, दिगंबर जाधव, दिनकर पाटील, अभिजित पाटील आदी मंडळी सोमवारी रात्रीच मुंबईला रवाना झाली आहेत. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता आदेश देतात याकडे जिल्हय़ातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Related posts: