|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पावसाचा जोर कमी, विसर्ग घटविला

पावसाचा जोर कमी, विसर्ग घटविला 

प्रतिनिधी/ सांगली

धरणेक्षत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने कोयना आणि वारणा धरणातून सुरू केलेला विसर्ग कमी केल्याने नदी पातळीत घट होत आहे. सध्या पातळी 32 फूट इतकी आहे. पाणीपातळीत घट सुरू झाल्याने सांगलीला महापुराचा धोका टळला असल्याने शहरासह नदीकाठच्या नागरिकांनी सुस्कारा टाकला आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने पाणीपातळी घट सुरू झाला असल्याने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

कोयना आणि वारणा धरणक्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या धूवाँधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीतून विसर्गात मोठी वाढ केली होती.  बुधवारी सकाळपासून कोयनेतून 89 हजारावर तर वारणेतून 12 हजारावर क्यूसेस विसर्ग करण्यात आला होता. यामुळे या पाण्यामुळे नद्यांच्या पाणीपताळीत वेगाने वाढ झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत 29 फुटांवर पातळी गेली. वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे सांगलीला पुन्हा पुराचा धोका वाढला होता. यामुळे शहरासह नदीकाठच्या गावांतील लोकांना धसका घेतला होता.

प्रशासनानेही नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्क राहावे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर थोडयाप्रमाणात कमी झाल्याने विसर्ग कमी करण्ययात आला. 89 हजारावरून तो निम्यावर आणला. यामुळे पाणी पातळी संथगतीने कमी होऊ लागली. 29.3 वरून पातळी कमी होत शनिवारी दुपारपर्यंत 28.5 इतकी झाली. मात्र रविवारी पावसाचा जोर थोडा वाढला. यामुळे पुन्हा पूर येण्याचा धोका निर्माण झाल्याने धास्ती वाढली होती. विसर्गातही वाढ करीत 70 हजारापर्यंत नेला होता. यामुळे सोमवारी सकाळी पातळी 33 फुटांवर गेली. यामुळे प्रशासनाने पुन्हा सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. मात्र सोमवारी पुन्हा पाऊस कमी झाली. यामुळे विसर्ग 45 हजारापर्यंत खाली आणला. दिवसभर पातळी स्थिर होत. त्यानंतर रात्रीपासून उतार सुरू झाला.

दरम्यान, पूरपरिस्थितीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, पाऊस कमी झाल्याने पातळी उतरत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरू नये. खबरदारी म्हणून एनडीआरच्या दोन तुकडया मागविण्यात आल्या असून एक सांगली तर दुसरी इस्लामपूर येथे आहे. दरम्यान, वारणा धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने 11 हजार 894 विसर्ग करण्यात आला.