|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जम्मू-काश्मीर भारताचाच भाग !

जम्मू-काश्मीर भारताचाच भाग ! 

पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांची अनहूत कबुली, संयुक्त राष्ट्रसंघात भारतासमोर पाकिस्तान निष्प्रभ

जिनेव्हा / वृत्तसंस्था

‘जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे, अशी अनपेक्षित आणि अनहूत कबुली पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सुंयक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत केलेल्या भाषणानंतर दिल्याने तो येथे चर्चेचा विषय बनला आहे. भाषणात पाकिस्तानने भारतावर नेहमीच्या पद्धतीने अनेक खोटे आणि अतिरंजित आरोप केले. काश्मीरमध्ये भारत अत्याचार करीत असून त्याची पाहणी करण्यासाठी मानवाधिकार परिषदेने तेथे पाहणी पथक पाठवावे, अशी बेजबाबदार मागणीही त्यांनी केली. तथापि, त्याचा कोणताही प्रभाव पडला नाही. भारताने तिखट प्रत्युत्तर देऊन पाकला पुरते नामोहरम केल्याचे दिसून आले.

तथापि, परिषदेतील वादविवादापेक्षाही नंतर कुरेशी यांनी केलेले विधान विषेश गाजले. आपल्या भाषणानंतर सभागृहाबाहेर ते पत्रकार परिषदेत तावातावाने पाकच्या खोटय़ा दाव्यांचा पुनरूच्चार करीत होते. पण बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीर हे ‘इंडियन स्टेट’ असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे काश्मीरवर दावा सांगण्याचा पाकने कितीही बनाव रचला असला तरी त्यांच्या तोंडून सत्य अपोआप बाहेर आले, अशा टिप्पण्या समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर होऊ लागल्या. यामुळे पाकिस्तानची पुन्हा पुरती नाचक्की झाल्याचे जगासमोर आले.

पाकिस्तानचे निर्लज्ज आरोप

या घटनेपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत भाषण करताना कुरेशी यांनी भारतावर बनावट आरोपांचा वर्षाव केला. भारताने घटनेचा अनुच्छेद 370 रद्द करून आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला आहे. काश्मीरच्या जनतेचा आवाज दाबला जात आहे. अभूतपूर्व निर्बंध लादण्यात आले आहेत. काश्मीरात मानवाधिकारंचे उल्लंघन सुरू आहे. भारत सरकारच्या दमनचक्रात तेथील जनता भरडून निघत आहे, इत्यादी आरोपांचे नेहमीचेच तुणतुणे वाजवून झाल्यानंतर त्यांनी काश्मीरमध्ये पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी केली.

भारताचे जोरदार प्रतिहल्ला 

भारताने पाकचा प्रत्येक आरोप समर्थपणे खोडून काढत बाजी उलटविली. संपूण जम्मू-काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे सत्य ठासून सांगितले. अनुच्छेद 370 चा निर्णय भारताच्या घटनेनुसार घेतला असून तो घेण्याचा भारताला अधिकारच आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत असून अन्य कोणत्याही देशाला त्यात नाक खुपसण्याचा अधिकार नाही. काश्मीरात घातलेले निर्बंध तेथील जनतेच्या सुरक्षेसाठीच आहेत. ते मोठय़ा प्रमाणात कमी करण्यात असून परिस्थिती शांत आहे. पाकिस्तानच तेथील जनतेला प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न असून त्याचे प्रत्येक डावपेच हाणून पाडण्यात येतील असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विजय ठाकूर सिंग यांनी केले.

पाक दहशतवादाचे केंद्र

पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचे केंद्र आहे. जगासमोर संकट उभ्या केलेल्या अनेक दहशतवादी संघटनांना पाकने आश्रय आणि समर्थन दिले आहे. त्या देशातील अनेक भागांमध्ये जनता पाक सरकारच्या अत्याचारांना कंटाळून बंड करून उठली आहे. सरहद्द प्रांत, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक प्रशासनाचे स्थानिकांवर अत्याचार चालू आहेत. स्वतःचे घर सांभाळायचे सोडून हा देश भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करीत असून त्याने सर्व नितीनियमांना धाब्यावर बसवले आहे. पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर पाक एकाकी पडला असून भारताच्या निर्णयाला जगाचे समर्थन प्राप्त आहे, अशा प्रभावी शब्दांमध्ये त्यांनी बाजू मांडली. 

पाककडून काँगेसचीच कोंडी

मानवाधिकार परिषदेसमोर पाकिस्तानने 115 पानांचे निवेदन सादर केले. त्याच्या पहिल्याच पानावर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीविषयी राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती इत्यादी नेत्यांनी उधळलेल्या मुक्ताफळांचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 काढून टाकल्यानंतर निरपराध माणसे मारली जात आहेत, असा जाहीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याचा उल्लेख त्यांच्या नावासकट पाकने निवेदनात केला आहे. भारतीय नेत्यांची ही विधाने पाकिस्तानच्या उपयोगी पडत आल्याने समाजमाध्यमांवर या नेत्यांविरोधात टीकेची झोड उठविण्यात आली आहे. पाकिस्तानने त्याच्या भारतातील समर्थकांचीच कोंडी करून खरा रंग दाखविला अशी टिप्पणी होत आहे.   

इम्रानच्या पक्षाचा नेता आश्रयासाठी भारतात

भारतावर खोटारडे आरोप करणाऱया पाकिस्तानचे पितळ उघडे पाडण्याचे काम इम्रान खान यांच्या पक्षाच्याच एका नेत्याने केले आहे. बलदेव कुमार सिंग हे त्यांचे नाव असून ते सध्या भारतात आहेत. ते खान याच्या तेहरिके इन्साफ या पक्षाचे आमदार होते. पाकमध्ये हिंदू आणि शीख यांच्या जिवीताला धोका आहे. त्यांच्या मुली पळविल्या जात असून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर पेले जात आहे. त्यामुळे आपण भारतात आश्रय मागितला आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी पाकमधील विदारक स्थितीचे वर्णन केले असून पाकचा मानवाधिकारांचा बुरखा फाडला. त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीनेही शाळेत आपल्याला मुस्लीम बनण्याचा आग्रह केला जात होता, असे सांगून तेथील भयानक स्थिती दृष्टीसमोर आणली.  

पाकिस्तान पुन्हा एकाकीच

भारताविरोधात अनेक प्रकारचे वाप्ताडन करूनही पाक जगाची सहानुभूती मिळविण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. मानवाधिकार परिषदेत भारताविरोधात त्याने अधिकृतरित्या प्रस्तावाची नोटीस दिलीच नाही. कारण अशी नोटीस देण्यासाठी 47 सदस्य देशांच्या समितीच्या बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागतो. तो मिळविण्यात पाक अयशस्वी ठरला. चीन व तुर्कस्तान वगळता त्याच्या बाजूने कोणीच उभे राहिले नसल्याचे समजते. त्यामुळे कुरेशी यांच्या भाषणानंतरही पाकने अधिकृत प्रस्ताव मांडण्याचे धाडस दाखविले नाही.

Related posts: