|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » कसोटीतही रोहित शर्मा सलामीवीर?

कसोटीतही रोहित शर्मा सलामीवीर? 

केएल राहुलच्या खराब फॉर्मच्या पार्श्वभूमीवर एमएसके प्रसाद यांचे संकेत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कसोटी क्रिकेटमध्ये विद्यमान सलामीवीर केएल राहुलला मागील बऱयाच कालावधीपासून सातत्याने खराब फॉर्ममधून मार्गोत्क्रमण करावे लागले आहे. निवडकर्त्यांनी त्याला यानंतरही सातत्याने संधी दिली. पण, तरीही तो लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयशी ठरला असून यामुळे रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून आजमावून पाहिले जावे, अशी मागणी होत आली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी हा पर्याय आपल्या विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.

गतवर्षी इंग्लंडमध्ये शतक झळकावणाऱया केएल राहुलला त्यानंतर एकदाही सूर सापडलेला नाही. मागील 12 कसोटी डावात तर त्याला अगदी एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याला झगडताना पाहणे चाहत्यांसाठीही गोंधळात टाकणारे आहे. पण, याचमुळे त्याच्यासमोर आता कसोटी संघातील जागा गमावण्याचे संकट आ वासून उभे राहिले आहे.

भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्मा सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात असून त्याला कसोटीत सलामीला पाठवले जावे, अशी सूचना यापूर्वी सौरभ गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही केली होती. विंडीज दौरा पूर्ण झाल्यानंतर निवडकर्त्यांमध्ये अद्याप चर्चा झालेली नाही. पण, रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरवायचे का, यावर निश्चितपणाने बैठकीत चर्चा होईल, असे एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

केएल राहुलमध्ये बरीच गुणवत्ता आहे. पण, सध्या तो कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ व्यतित करावा लागेल’, असे माजी यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या एमएसके प्रसाद यांनी येथे नमूद केले.

Related posts: