|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » मतभिन्नता म्हणजे मतभेद नव्हे

मतभिन्नता म्हणजे मतभेद नव्हे 

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, हे ओघानेच येतेः विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चेवर रवी शास्त्रींचे प्रतिपादन

दुबई / वृत्तसंस्था

दोन-दोन व्यक्तीत मतभिन्नता असते आणि कोणत्याही क्रिकेट संघात तरी 15 खेळाडूंचा समावेश असतो. जितक्या व्यक्ती, तितक्या प्रवृत्ती, हे साहजिकच आहे. त्यामुळे, यातील प्रत्येकात मतभिन्नता असू शकते. अर्थात, मतभिन्नता असणे, याचा अर्थ त्यांच्यात मतभेद आहेत, असा होत नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. कर्णधार विराट कोहली व मर्यादित क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याचे वृत्त सातत्याने प्रकाशझोतात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते.

‘जेव्हा 15 सदस्यीय संघ चर्चा करत असतो, त्यावेळी त्यांच्यात मतभिन्नता असणे साहजिकच असते. मी स्वतःही त्या सर्वांनी एकाच रेषेत विचार करावा, अशी अपेक्षा अजिबात करणार नाही. मतभिन्नतेमुळे विविध मुद्यांवर चर्चा होते आणि त्यातील नव्या विचारांवर, प्रयोगावर लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी देणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच सर्वोत्तम काय, हे ठरवता येते’, असे शास्त्री पुढे म्हणाले. ‘काही वेळा संघातील अगदी नवा खेळाडू देखील अशी काही रणनीती मांडतो की, त्याचा आम्ही सर्व अनुभवींनी विचारही केलेला नसतो. त्यामुळे, अशी मतभिन्नता हे मतभेदाच्या श्रेणीत मोजले जाऊ नये’, असे शास्त्रींनी स्पष्ट केले. येथे ते ‘गल्फ न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.

विंडीज दौऱयावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने देखील रोहित शर्माशी आपले कोणतेही वाद नसल्याचा दावा केला होता. पण, तरीही याबाबतीत चर्चा सुरुच राहिली आहे. रोहित व विराट यांच्यात वाद असते तर रोहितने इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत 5 शतके झळकावली नसती, असा दावाही शास्त्री यांनी यादरम्यान केला. शास्त्री यांची अलीकडेच 2021 विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली आहे.

‘मागील 5 वर्षांपासून मी सातत्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये राहिलो आहे. मी सर्व खेळाडूंना तसे कसे एकसंधपणे खेळत आले आहेत, ते जवळून पाहिले आहे. एकमेकांना पूरक खेळ ते कसा साकारतात, हे अनुभवले आहे. त्यामुळे, माझ्या दृष्टीने अशा वादाच्या चर्चा निव्वळ बिनबुडाच्या आहेत’, असे शास्त्रींनी एका प्रश्नाला उत्तर देताना पुढे नमूद केले.

शास्त्रींचे तीन प्रश्न

‘जर खरोखरच विराट व रोहित यांच्यात वाद असते तर विराट इतका सर्वोत्तम कसा खेळला असता, रोहितने तेथे 5 शतके कशी झळकावली असती आणि या दोघांनी तिथे बरेच भागीदारीचे डाव कसे साकारले असते’, असे तीन प्रश्न शास्त्री यांनी येथे उपस्थित केले.

विराट-रोहित यांच्यात वाद आहेत, या चर्चेने संघभावनेला फटका बसतो का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मागील 5 वर्षे संघ असा उत्तम खेळत असताना संघाला पाठबळ दर्शवत कायम राहणे महत्त्वाचे असते. ज्या समस्या असतात, त्यावर मार्ग काढत वातावरण सकारात्मक ठेवणे, हा प्राधान्यक्रम असतो. कारण, सध्या दिसते तितके सातत्य मी कधीही अनुभवलेले नाही. विंडीजने 1980 च्या दशकात आणि ऑस्ट्रेलियाने 1990 च्या दशकात जो दबदबा गाजवला, त्याचाच कित्ता गिरवण्याची संधी आता भारताकडे आहे. टी-20, वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये, त्याचप्रमाणे बडय़ा आयसीसी स्पर्धांमध्ये संघाने जी हुकूमत गाजवली, ती निश्चितच अविश्वसनीय आहे’.

 

Related posts: