|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा अर्बनची निवडणूक लांबणीवर

म्हापसा अर्बनची निवडणूक लांबणीवर 

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर पीएमसी बँकेत विलिनीकरणाचा निर्णय

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा अर्बन बँकेची 14 सप्टेंबर रोजी होणारी संचालक मंडळाची निवडणूक अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. बँकेचे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत (पीएमसी) विलिनीकरण करण्याचा निर्णय झाला असून तसे झाल्यास सर्व प्रश्न मिटणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेऊन बँक वाचविण्यासाठी विलिनीकरण करून सर्वतोपरी प्रयत्न कारवे, अशी सूचना संबंधितांना केली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय सर्वांनी मान्य केल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन गुरुदास नाटेकर यांनी दिली आहे.

पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हापसा अर्बन व पीएमसी बँकेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. यावेळी सहकारमंत्री गोविंद गावडे, राज्याचे मुख्य सचिव दौलत हवालदार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारीवर्ग, म्हापसा अर्बन बँकेचे चेअरमन गुरुदास नाटेकर, संचालक ऍड. रमाकांत खलप, आश्विन खलप, सरव्यवस्थापक शैलेंद्र सावंत, बँक कर्मचारी संघटनेचे नेते, पीएमसी बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हापसा अर्बनबाबत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यानंतर संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. राज्यातील या बँकेला वाचविणे सरकारचे कर्तव्य असून त्यामुळे बँकेला वाचविण्यासाठी विलिनीकरण हाच एकमेव मार्ग आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले होते. त्यानुसार निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गुरुदास नाटेकर यांनी दिली.

संचालक मंडळाची तातडीची बैठक

दरम्यान, मंगळवारी सकाळी म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीचा तपशील संचालकांसमोर ठेवण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी संचालक मंडळ, कर्मचारी संघटना तसेच पीएमसी संचालक मंडळाशी वेगवेगळी बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पीएमसी बँकेने काही अटी ठेवल्या होत्या त्यावरही बैठकीत चर्चा झाली. येत्या 15 दिवसांच्या आत विलिनीकरणाद्वारे म्हापसा अर्बन प्रश्नी तोडगा काढण्यास सरकारला सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यांनी 14 रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यास सांगितल्याने अखेर सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मान देवून ही निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती नाटेकर यांनी दिली.

विलिनीकरण झाल्यावर 7 दिवसानंतर खास सर्वसाधारण सभा घेण्याचा आदेशही देण्यात आला आहे. त्यानुसार ही बैठक घेण्यात येणार आहे. त्याची तारीख उद्या निश्चित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.  

मुख्यमंत्री, खातेदार, भागधारक, कायम ठेवीदारांचे आभार

आम्हाला आमची म्हापसा अर्बन बँक वाचवायची आहे. यासाठी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचेही सहकार्य मिळत आहे. ही बँक वाचविण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. विलिनीकरण होऊन आमची बँक वाचेल अशी खात्री आम्हाला आहे. अन्य मार्गही आम्ही तपासून पाहत आहोत. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे तसेच कायम ठेवीदार, भागधारकांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. यापुढेही ते आम्हाला सहकार्य करतील. राज्यात बँकेचे 1 लाख 19 हजार भारधारक आहेतअडीच लाख कायम ठेवीदार व खातेदार आहेत. त्या सर्वांचे नाटेकर यांनी आभार मानले.

Related posts: