|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्रीदर्शनासाठी भक्तांच्या गर्दीने रस्ते फुलले

श्रीदर्शनासाठी भक्तांच्या गर्दीने रस्ते फुलले 

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचे थवे मोठय़ा संख्येने लोटले होते. पावसाने उघडीप दिल्याने भक्तांच्या उत्साहाला अपूर्व उधाण आले होते. या उधाणामुळे शहरातील सर्वच रस्ते फुलले होते.

गणरायांच्या आगमनापासून पावसाने आपली जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे भक्तांचा विरस झाला होता. पहिल्या सहा दिवसात झालेल्या पावसाने श्रीदर्शनाच्या उत्साहावर पाणी फिरविले होते. मात्र मंगळवारी पावसाच्या सरींनी विश्रांती घेतली. त्यामुळे भक्तांच्या उत्साहाला रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर फिरुन गणेश दर्शनाचा आनंद घेतला. मिळेल त्या वाहनांनी नागरिक दाखल होत होते.

मंगळवारी रात्री गणेशभक्तांच्या गर्दीने शहरातील सर्व रस्ते फुलले होते. श्रीमूर्तींचे दर्शन घेऊन बाप्पांचे रुप याचिदेही याचि डोळा साठविण्यासाठी भक्तांचे थवे दूरवरुन लोटले होते. बेळगाव शहर परिसरातील मध्यवर्तै भागात असणारे बाजारपेठेतील सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. तसेच टिळकवाडी, शहापूर, वडगाव आणि इतर उपनगरी भागातील देखील भक्तांचा संचार सुरु होता. युवकांचे थवे गणरायांचा जयघोष करीत रस्त्यांवरुन फिरत होते. श्री गणेशाच्या जयघोषाने अवघ्या शहरात चैतन्याचा संचार झाल्याचे दिसून आले.

श्री गणेशाच्या दर्शनाबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही भक्तांची ठिकठिकाणी गर्दी केली होती. खाद्यपदार्थांची विक्री करणारी वाहने, खेळणी विक्री करणारे विपेते यांचीही चलती सुरु होती. बालचमुह अबालवृध्द आणि महिलावर्ग या श्रीदर्शन सोहळय़ात सहभागी झाले होते.