|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बा गणराया, गोव्यावरील विघ्ने दूर कर, म्हाराजा!

बा गणराया, गोव्यावरील विघ्ने दूर कर, म्हाराजा! 

यंदाही गोव्यातील गणेशभक्तांना खड्डय़ांतून प्रवास करावा लागला. ऐन चतुर्थीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. काही ठिकाणी नळ पाण्याअभावी कोरडे राहिले. अनियमित पाणीपुरवठय़ाबद्दल काही ठिकाणी मोर्चेही नेण्यात आले. मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसाचे प्रतिकूल परिणाम गोव्यातील जनतेच्या आरोग्यावरही दिसून येत आहेत.

गोव्यात आज काही गावे वगळता प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात होत आहेत. लॉटरी, देणगी स्वरुपात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गंगाजळीही निर्माण होतात. हा निधी सत्कारणी लागणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये काही गणेशोत्सव मंडळे झालेल्या आर्थिक लाभातून शाळा दत्तक योजना, गरीब घटकांसाठी मदत तसेच काही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. यंदाच्या पूरग्रस्तांनाही काही गणेश मंडळांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ उत्सवापुरतेच सीमित न राहता मंडळाचे उपक्रम वर्षभर चालू राहणे गरजेचे आहे. यातूनच समाज पर्यायाने गोवा राज्य एका वेगळय़ा दिशेने वाटचाल करील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आज गोव्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक संकटे आ।़।़ वासून उभी आहेत. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दक्ष राहणे तसेच उपाययोजना आखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आज स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळांवर आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी मंडळांनी पावले उचलणे कर्तव्य ठरते.

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 127 वे वर्ष आहे. या मंडळाचे सुमारे चौदा उपक्रम आहेत. त्यातील बारा कार्यक्रम हे दीन-दुबळय़ांची सेवा करणारे आहेत. तसेच हे उपक्रम केवळ उत्सवापुरतेच मर्यादित नाहीत तर ते कायमस्वरुपी चालणारे आहेत. या मंडळाचा आदर्श इतर गणेश मंडळांनीही गिरवावा, हे येथे नमूद करावेसे वाटते.

आज शांतताप्रिय तथा संस्कृतीप्रधान गोवा राज्यात अमली पदार्थांचे पेव फुटले असून युवा पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आ।़।़ वासून उभा आहे. ज्याप्रमाणे गोंयकाराच्या खिशात दारूचे क्वाटर्स आढळावे त्याप्रमाणे आज अमली पदार्थ पाचवीलाच पूजले आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. गोव्यातील अर्थकारण आज अमली पदार्थांच्या जोरावर चालते का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. 

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा अधिवेशनात अमली पदार्थांच्या विषयावर गांभिर्याने चर्चा झाली. राज्यात ड्रग्जचा वापर वाढत असल्याची अनेक उदाहरणे आमदारांनी अधिवेशनात मांडली. अमली पदार्थांची गोव्यातील व्याप्ती खरोखरच चिंताजनक आहे. अमली पदार्थांचा सुळसुळाट हा आता फक्त समुद्रकिनारे किंवा पर्यटन स्थळांपुरताच मर्यादित राहिला नसून संपूर्ण गोव्यात त्यांनी आपले जाळे विणले आहे. गोव्यातील ग्रामीण भागातही हा अमली पदार्थ पोहोचला आहे. गोव्यातील विद्यालये, महाविद्यालयांमध्येही अमली पदार्थ उपलब्ध होऊ लागला आहे. गोव्यातील विद्यार्थीवर्गही पूर्णपणे अमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. शाळा-कॉलेज परिसरात अमली पदार्थ मिळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही आमदारांनी विधानसभेत सुचविले आहे.

कॅसिनोमुळे गोव्याची संस्कृती पूर्णपणे नष्ट होत चालली असून या संस्कृतीमुळे खऱया अर्थाने अमली पदार्थांचे लोण वाढलेले आहे. प्रत्येक ठिकाणी काही दलाल हा व्यवसाय करीत आहेत. ड्रग्जविरोधी मोहिमेचा धडाका सुरूच असून पोलिसांचे छापासत्र जरी सुरू असले तरी किरकोळ आरोपीच पकडले जातात. मुख्य धेंडापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यात गांभीर्याने लक्ष घालून अमली पदार्थ विरोधी मोहीम आखणे, जागृती करणे आवश्यक आहे. आज गोवा राज्य गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. खून, दरोडे, आत्महत्या, अपघात, चोरीचे प्रमाण वाढत आहे. या विरोधात योग्य ती पावले उचलून गोवा राज्य सुजलाम्, सुफलाम् बनविणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे तसेच गोमंतकीयांचे कर्तव्य ठरते.

गोव्याची मदार केवळ पर्यटन व खाण व्यवसायावर आहे, मात्र हे दोन्ही व्यवसाय संकटात आहेत. हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करूया तसेच गोमंतकीयांचे आरोग्यही धोक्यात आहे. गोव्यातील दिग्गज नेते आजाराने निधन पावले आहेत. फॉर्मेलिनयुक्त मासेही गोमंतकीयांच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न झाले आहेत. खरोखरच, गोव्यावरचे हे दुर्दैवाचे दशावतार आहेत.

स्वच्छ भारत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यासह देशातील सर्व राज्यांनी स्वच्छतेचा नारा दिला आहे. गोवा राज्यातही राज्यपाल मृदुला सिन्हा यांना स्वच्छतेच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सर्व ठिकाणी स्वच्छतेच्यादृष्टीने उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रयत्न करून ही मोहीम खऱया अर्थाने यशस्वी करावी.

गणेशोत्सव म्हणजे पर्यावरणाचे खऱया अर्थाने पूजन. माटोळीचे पूजन अर्थात निसर्गाचे जतन करण्याचा संदेश हा गणेशोत्सव देतो. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होण्याच्यादृष्टीने अनेकांनी काळजी घेतली. दारुकामाची आतषबाजी मोठय़ा प्रमाणात टाळली आहे. ध्वनिप्रदूषणही होणार नाही याची काळजी घेतली. थर्माकॉलचा वापर बहुतांश ठिकाणी टाळण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती न पूजता इको-प्रेण्डली मूर्ती पूजन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कटाक्ष बाळगला.

गोव्यात ठिकठिकाणी पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्याचे आश्वासन गोवा सरकारने दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार असमर्थ ठरले. गणेशभक्तांना या खड्डय़ातून प्रवास करावा लागला. संततधार पावसामुळे गोव्यात विजेच्या लपंडावालाही सामोरे जावे लागले. ऐन चतुर्थीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला. काही ठिकाणी नळ पाण्याअभावी कोरडे राहिले. अनियमित पाणीपुरवठय़ाबद्दल काही ठिकाणी पाणीपुरवठा कार्यालयांवर मोर्चेही नेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसाचे प्रतिकूल परिणाम गोव्यातील जनतेच्या आरोग्यावरही दिसून येत आहेत. गोव्यातील अनेक आरोग्य केंद्रात, सरकारी व खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळी रोगांचा फैलाव रोखण्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने विविध ठिकाणी डेंग्यूचा फैलावही वाढीस लागला आहे.

आज आम्ही विद्यमान स्थितीत समस्त गोमंतकीय गणेशभक्त ‘श्रीं’कडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, आमच्या गोवा राज्यावर येणारी विघ्ने दूर कर महाराजा, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा!’

राजेश परब

Related posts: