|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार 

मिळालेले धन ‘गंगार्पण’ केले जाणार, 14 सप्टेंबरपासून प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मान्यवरांकडून मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावातून मिळालेले धन ‘नमामी गंगे’ या गंगा स्वच्छता अभियानासाठी दिले जाणार आहे. ही घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल बुधवारी येथे केली. या भेटवस्तू मोदींना गेल्या सहा महिन्याम मिळाल्या आहेत. त्यांचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने केला जाणार असून त्याचा 14 सप्टेंबरपासून होणार आहे. हा लिलाव www.pmmementos.gov.in या पोर्टलवर केला जाणार आहे, अशी माहिती प्रल्हाद पटेल यांनी दिली. या भेटवस्तूंमध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्तीही आहेत. त्यात भगवान गणेश, भगवान हनुमान आदी देवतांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे डॉ. भीमराव आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांच्या देखील प्रतिमा आहेत. याखेरीज 576 शाली, 964 महावस्त्रे, 88 पगडय़ा, व अनेक इतर वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचे प्रदर्शन नवी दिल्ली येथील आधुनिक कला राष्ट्रीय सभागृहात भरविण्यात आलेल्या आहेत. लिलावात कोणीही भाग घेऊ शकणार आहे.

नमामी गंगे या प्रकल्पाचा प्रारंभ 13 मे 2015 या दिवशी झाला होता. गंगा नदीची पूर्ण स्वच्छता करून तिला नवजीवन देण्याच्या उद्देशाने तो सुरू करण्यात आला आहे. गंगेप्रमाणेच तिच्या सर्व उपनद्यांचाही या प्रकल्पात समावेश आहे.

यापूर्वीही झाला होता लिलाव

जानेवारी 2019 मध्ये मोदींना मिळालेल्या 1900 भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या अनोख्या लाकडी दुचाकीच्या लिलावातून 5 लाख रुपये मिळाले होते. तर आसाममध्ये त्यांना देण्यात आलेल्या पारंपरिक ‘होराई’ च्या लिलावातून तब्बल 12 लाख रुपयांची प्राप्ती झाली होती. गौतम बुद्धांच्या प्रतिमेला 7 लाख रुपये मिळाले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करून त्यातून मिळालेले धन मुलींच्या शिक्षण प्रकल्पासाठी राज्य सरकारला दिले होते.

लिलावातून समाजसेवा

मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याची मोदींची प्रारंभापासून प्रथा

लिलावातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची प्रथा 

Related posts: