|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खिंडार

काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खिंडार 

हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक भाजपमध्ये

प्रतिनिधी/ मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत रंगणार आहे. तसेच नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्ये÷ नेते, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांच्यासह 48 नगरसेवकांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई पालिकेतील सत्ता धोक्मयात आली आहे. या दोन बडय़ा नेत्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.

आघाडीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटत नसल्याने हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. या नाराजीतून त्यांनी गेल्या आठवडय़ात आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज गरवारे क्लबमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. यावेळी त्यांची कन्या अंकिता, चिरंजीव राजवर्धन तसेच कुटुंबिय उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांच्या अंगावर भाजपचा शेला टाकून त्यांनाही पक्षप्रवेश दिला.

भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. आघाडी सरकारच्या काळात विरोधात असताना आम्ही जेव्हा तत्कालीन सरकारवर शब्दांचे बुलेट सोडायचो तेव्हा पाटील हे बुलेटपुफ जॅकेटप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे ढाल बनायचे. नंतर प्रेमाने येऊन आमची समजूत काढायचे. पाटील यांनी प्रभावी मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि सरकारला फायदा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

शेजार बदलू शकत नाही

हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघाला लागूनच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा बारामती मतदारसंघ आहे. त्याचा उल्लेख करून पाटील म्हणाले, आमच्या मतदारसंघाचा भूगोल तुम्हाला माहीत आहे. आपण मित्र आणि शत्रू बदलू शकतो. पण भूगोल बदलू शकत नाही, असे सांगत पवारांपासून संरक्षण देण्याची अप्रत्यक्ष विनंती पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

Related posts: