|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवादाचा मुकाबला करण्यास भारत समर्थ

दहशतवादाचा मुकाबला करण्यास भारत समर्थ 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास : पाकिस्तानातच दहशतवादाची पाळेमुळे

वृत्तसंस्था/ लखनौ

दहशतवादाचा मुकाबला करण्यास भारत पूर्णत: समर्थ आहे. भविष्यातही आमचे सामर्थ्य अबाधित राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. आमच्या शेजारच्या देशाकडून म्हणजेच पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. याविरोधात संपूर्ण जगाने एकत्रित येण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

मथुरा येथे विविध योजनांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दात फटकारले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 11 सप्टेंबरला अमेरिकेतील शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी विश्व धर्म संमेलनामध्ये ऐतिहासिक भाषण केले होते. त्याचबरोबर 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. आज दहशतवाद ही एक विचारधारा होत आहे. ती एक जागतिक समस्या बनली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारे काही देश आहेत. यांच्याविरोधात संपूर्ण जगाने एकत्रित येऊन ठोस कारवाई करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2 ऑक्टोबर रोजी आपण महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरा करणार आहोत. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. आपणही त्याच मार्गावर वाटचाल केल्यास हीच त्यांना खऱया अर्थाने आदरांजली ठरेल. देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.  

गाय शब्दानेच काहींच्या अंगावर काटा

ओम आणि गाय हे दोन शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना देश पुन्हा भूतकाळात गेल्यासारखा वाटतो. अशा लोकांमुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.