|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज नगरी श्रीं च्या निरोपासाठी सज्ज

मिरज नगरी श्रीं च्या निरोपासाठी सज्ज 

आज 150 गणेश मंडळांच्या श्रींचे विसर्जन, मोठा बंदोबस्त, डॉल्बीवर निर्बंध, उंच मूर्तींचे सांगलीत विसर्जन

प्रतिनिधी/ मिरज

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रसिध्द असणाऱया गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी शहर सज्ज झाले आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी 150 हून अधिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. यासाठी एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱयांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून गणेश मंडळाचे स्वागत केले जाणार आहे.

   गुरूवारी अनंत चतुर्दशी आहे. गणेश विसर्जनासाठी मोठी मिरवणूक शहरात निघते. शहरातील ही मिरवणूक गेली अनेक वर्षे गणेशभक्तांचे आकर्षण ठरली आहे. सुमारे 20 तासाहून अधिक काळ चालणारी मिरवणूक दक्षिण महाराष्ट्रातील लक्षवेधी असते. मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱया स्वागत कमानी हे या मिरवणुकीचे आकर्षण असते. यंदा दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या महापूराचे सावट या उत्सवावर आहे. त्यामुळे स्वागत कमानी रद्द करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात मंडळांनीही देखावे केले नव्हते. यंदाच्या उत्सवात फारसा उत्साह जाणवला नाही. त्यामुळे 11 व्या दिवशी निघणाऱया विसर्जन मिरवणुकीवरही महापुराचे सावट जाणवत आहे. अनेक मंडळांनी साधेपणाने मिरवणुका काढण्याचे ठरवले आहे.

  आज 150 हून अधिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होत आहे. त्यासाठी गणेश तलावात प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठे तराफे आणि क्रेन, बोटी यांची सोय केली आहे. दहा फूटांवरील मूर्ती मात्र तलावात विसर्जित करण्यात येणार नाहीत. त्या सांगलीतील काळीखण येथे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा त्या मूर्ती दान कराव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

 मिरवणुकीत येणाऱया भाविकांची संख्या पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या नेतृत्त्वाखाली दोन उपाधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 65 पोलीस उपनिरीक्षक, 700 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, जलद कृती दलाचे जवान, कमांडो पथक, डॉग स्कॉड, दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड, विशेष पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, निर्भया सखी असा सुमारे एक हजार व्यक्तींचा ताफा बंदोबस्तासाठी कार्यरत राहणार आहे.

30 हून अधिक सीसीटीव्हीद्वारे मिरवणुकीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. बुधवारी बालगंधर्व नाटय़गृहात कर्मचाऱयांना बंदोबस्त नेमून देण्यात आला. वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. परगावांहून येणाऱया भाविकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

   सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार ध्वनीमर्यादेचे पालन करून मिरवणूका काढण्यात याव्यात, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. डॉल्बी लावल्यास जप्त करून डॉल्बीमालक आणि मंडळांच्या पदाधिकाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. पाचव्या आणि नवव्या दिवशी मिरवणूकीत डॉल्बी लावणाऱया नऊ मंडळांवर कारवाई करण्यात आल्याचे उपाधीक्षक संदीपसिंग गील यांनी सांगितले.

 महापालिकेच्यावतीनेही मिरवणूकीसाठी तयारी करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य पथक, औषधोपचाराची सोय, अग्निशमन दल, रूग्णवाहिका अशा सोयी पुरविल्या आहेत. गणेश तलावावर कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. मूर्तीदान घेण्याची सोयही करण्यात आली आहे.

Related posts: